आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणाचा फटका डॉक्टर व मेडिकल स्टाफला बसला. आमदार निवासातील कोविड केअर सेंटरची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपूर विभागातील विविध जिल्ह्यातून पोहोचलेल्या मेडिकल स्टाफला नियुक्तीपत्र मिळण्यासाठी दारोदार भटकावे लागले.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता नागपूर विभागातील काही जिल्ह्यातून मेडिकल स्टाफचे लोक नागपुरात पोहचले. पहिले ते नियुक्तीचा आदेश मिळविण्यासाठी मनपात पोहचले. तेथून त्यांना आमदार निवासात पाठविण्यात आले. परंतु तिथे कुठलाही अधिकारी नव्हता. सोबतच ज्या दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर बनविण्यात आले आहे, तेही रिकामे होते. त्यामुळे मेडिकल स्टाफ पुन्हा मनपात परत आला. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले. जिल्हा परिषदेतूनही त्यांना आमदार निवासात पाठविण्यात आले. आमदार निवासातून माहिती देण्यात आली की, तिथे नोडल अधिकारी नाही आहे. तिथे असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याला नियुक्त करून घेण्याचे अधिकार नाही. त्यामुळे त्यांना पीडब्ल्यूडीमध्ये पाठविण्यात आले. पीडब्ल्यूडीमध्ये गेल्यानंतर परत त्यांना मनपात पाठविण्यात आले.
- कुणीही केली नाही व्यवस्था
मेडिकल स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी ते आमदार निवासात बनलेल्या सीसीटीमध्ये कार्यरत होते. २० नोव्हेंबर २०२० रोजी त्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा बोलाविण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. त्यांना नियुक्तीपत्र नागपुरात मिळेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळीच ते नागपुरात पोहचले. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद होते. अशापरिस्थितीत त्यांना उपाशीतापाशी भटकावे लागले. मनपा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने त्यांची खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली नाही.