रियाज अहमद
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेडिकल)मध्ये गेल्या एक वर्षात ५०३ कोरोना संक्रमित रुग्णांवर यशस्वी सर्जरी झाली. मेडिकलमधील डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. लोकांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी घेतलेला पुढाकारामुळेच हे शक्य झाले आहे. संक्रमित रुग्णांच्या सर्जरीदरम्यान डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ संक्रमित होण्याची भीती असते. या बिकट परिस्थितीत डॉक्टर तास न् तास पीपीई किट घालून ऑपरेशन थिएटरमध्ये राहत होते. सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांबरोबरच ॲनस्थेसिया देणाऱ्या डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची होती. ते सुद्धा ऑपरेशनदरम्यान पीपीई किट घालून उपस्थित राहत होेते. यात ॲनस्थेसिया विभागाचे प्रमुख डॉ. वासुदेव बारसागडे यांची भूमिका अन्य डॉक्टरांसाठी प्रेरणादायी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२० ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत ५०३ कोरोना संक्रमित रुग्णांवर सर्जरी झाली. यात सर्वाधिक प्रसूतीच्या ४१५ सर्जरी आहेत. त्याचबरोबर पोट, आतडीच्या २८, गंभीर जखमींच्या २७, ट्रॉमामध्ये आलेल्या अपघाताची १४ प्रकरणे आहेत. अन्य गंभीर आजाराचे १९ ऑपरेशन झाले आहे.
संक्रमितांची संख्या वाढल्याने मनुष्यबळावर परिणाम
नागपूर शहरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात डॉक्टरसह मेडिकल स्टाफच्या मनुष्यबळावर परिणाम झाला आहे. अशात मेडिकलच्या डॉक्टरांनी संक्रमित झालेल्या रुग्णांची सर्जरी वेळेवर केली. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात सर्जरी होऊ शकल्या.
डॉक्टरांचे साहस म्हणावे लागेल
मेडिकलचे ॲनस्थेसिया विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. वृशाली अंकलवार म्हणाल्या, संक्रमित रुग्णांच्या सर्जरीदरम्यान इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. बहुतांश डॉक्टर, वैद्यकीय स्टाफ सर्जरीनंतर संक्रमित होतात. सामान्य रुग्णांच्या सर्जरीला जास्त वेळ लागत नाही. परंतु कोरोना संक्रमित रुग्णांची सर्जरी करणे हे साहसी काम आहे. यात पीपीई किट, गॉगल लावून तास न् तास ऑपरेशन थिएटरमध्ये राहावे लागते. प्रत्येक सर्जरीदरम्यान कुणी ना कुणी संक्रमित होत आहे. सर्जरीदरम्यान रुग्णांना ॲनस्थेसिया देण्याबरोबरच अनेक अडचणी आहेत. त्यामुळे डॉक्टरांना सातत्याने रुग्णाजवळ थांबावे लागते. बरेचदा सहा ते सात ताससुद्धा लागतात. एकेका दिवसात पाच ते सहा सर्जरीही केल्या आहेत.