सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधशास्त्र विभागाने जपानमधील ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे. २७ रुग्णांना हे औषध दिले असून काहींवर सकारात्मक परिणाम आढळून आला आहे. लवकरच ‘ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया’कडे या संदर्भातील अहवाल पाठविला जाण्याची शक्यता आहे. कोविड-१९वर औषध अद्यापही उपलब्ध नाही. जगात विविध देशात वेगवेगळ्या औषधांना घेऊन चाचणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधनात्मक स्तरावर औषधांचा वापर करून बघण्याचा सल्ला दिला होता.
गपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यानुसार जपान येथे उत्पादित होणाऱ्या ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ हे ‘अॅन्टीफ्लू मेडिसीन’ची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जपानकडून या औषधाची मागणी केली. औषध उपलब्ध होताच २७ रुग्णांवर त्याची चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे, जपान, युके व रशियामध्येही या औषधाने अनेक रुग्ण बरे झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु अंतिम निष्कर्षापर्यंत अद्यापही कुणीच पोहचले नाही. आपल्याकडे या औषधाचे चांगले निकाल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रशियामध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ औषधाचा उपचारात समावेशप्राप्त माहितीनुसार, चीनमध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधावर फेब्रुवारी महिन्यापासून चाचणी सुरू आहे. इटलीमध्ये मार्च महिन्यापासून, अमेरिकेत एप्रिल महिन्यापासून तर इंग्लंडमध्ये मे महिन्यापासून संशोधन सुरू आहे. रशियामध्ये या औषधावरील संशोधन संपले असून त्यांना चांगले परिणाम मिळाले आहेत. यामुळे त्यांनी २९ मे पासून उपचारामध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधाचा समावेशही केला आहे.
इव्हर्मेक्टिन, अँजिथ्रोमायसिन आणि प्लाझ्मा थेरपीवरही संशोधनमेडिकलमध्येच ‘इव्हर्मेक्टिन’ आणि ‘अँजिथ्रोमायसिन’ या औषधांच्या मिश्रणाची वैद्यकीय चाचणी काही बाधितांवर सुरू आहे. याचेही चांगले परिणाम समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्लाझ्मा थेरपीवरही संशोधन सुरू असून, पहिल्या टप्प्यात बाधित नसलेल्या रुग्णाचा प्लाझ्माही घेण्यात आला आहे. यावरील निष्कर्ष लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
सचिव डॉ. मुखर्जी यांनी केले ट्वीटवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी याला घेऊन ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध औषधांवर संशोधन सुरू आहे. त्यापैकी ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अॅन्टीफ्लू मेडिसीन’वर चाचणी सुरू आहे. नागपूर, मुंबई व औरंगाबाद मेडिकलमध्ये चाचणीला सुरुवात झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.लवकरच निष्कर्षावर पोहचणारमेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात औषधवैद्यकशास्त्र विभागात ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ ‘अॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. २७ रुग्णांवर याचे संशोधन केले आहे. या औषधाचा रुग्णांवर काय परिणाम झाला यावरील निष्कर्ष लवकरच ‘ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया’कडे सादर केला जाणार आहे.- डॉ. राजेश गोसावी, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल