लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मेडिकलच्या मानसोपचार विभागात ‘ड्रग्ज ट्रीटमेंट क्लिनिक’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. चरस, गांजा, दारू यासारख्या व्यसनावर उपचाराला सुरुवात झाल्याने नागपूरच नव्हे तर विदर्भातील रुग्णासाठी हे ‘क्लिनिक’ आशेचे किरण ठरले आहे. विशेष म्हणजे, राज्यात धुळेनंतर हे दुसरे केंद्र आहे.‘ड्रग्ज ट्रीटमेंट क्लिनिक’चे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘एनडीपीएस सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. राजेंद्र निकम, मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत टिपले उपस्थित होते.डॉ. मित्रा म्हणाले, अमली पदार्थाचे व्यसन हे शारीरिक, मानसिक, कौटुंबिकच नव्हे तर सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. भारतासह जगभरात याचे व्यसन वाढत चालले आहे. तरुण पिढी फॅशन, आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली व्यसनाकडे ओढली जात आहे. ड्रग्स, चरस, गांजा, दारूच्या आहारी जात आहे. या व्यसनामुळे होणारे आजार शरीराला घातक ठरतात. यासाठी व्यसनाधीन व्यक्तीची मानसिकता बदलणे, त्याला वेळीच उपचाराखाली आणणे, त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने राज्यात धुळे येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’च्या नावाखाली उपचार केंद्र सुरू केले आहे. आता नागपूरच्या मेडिकलमध्येही हे सेंटर सुरू झाले आहे. या केंद्रासाठी शासनाने एक समुपदेशक, एक मानसोपचार तज्ज्ञ, परिचारिका व औषधे उपलब्ध करून दिली आहेत. यावेळी डॉ. मनीष ठाकरे, डॉ. सुधीर महाजन, डॉ. प्रांजली भगत, डॉ. स्नेहल निंभोरकर, डॉ. स्नेहल बाभूळकर, डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते.दुपारी ३ पर्यंत रुग्णसेवेत सेंटरमेडिकलमधील ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’ची वेळ सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत आहे. डॉ. ठाकरे म्हणाले, व्यसनाधीन व्यक्तींना केवळ व्यसन लागलेले नसते त्यांना मानसिक आजारही असतो. या व्यक्तींना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी मेंदूतील रसायन स्थिर करणे गरजेचे असते. ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’मध्ये यावर औषधोपचार केला जाईल, सोबतच रुग्ण व त्याच्या कुटुंबाचेही समुपदेशन केले जाईल.
मेडिकल : आता व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 12:47 AM
विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मेडिकलच्या मानसोपचार विभागात ‘ड्रग्ज ट्रीटमेंट क्लिनिक’ला मंगळवारपासून सुरुवात झाली.
ठळक मुद्दे‘ड्रग्ज ट्रीटमेंट क्लिनिक’ला सुरुवात