नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आता ‘टाटा’लाही सहभागी करून घेत हॉस्पिटलचा प्रस्ताव त्यांनाही पाठविण्यात आला आहे. या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी सरकारने ७६ कोटी, तर यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी २३ कोटी रुपये दिले आहेत.
मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलची घोषणा होऊन आता सात वर्षांहून अधिक कालावधी होत आहे; परंतु अद्यापही हे हॉस्पिटल कागदावरच आहे. विशेष म्हणजे, बांधकाम व यंत्रसामग्रीच्या खर्चाच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे; परंतु मेडिकलच्या ताब्यात असलेली टीबी वॉर्ड परिसरातील जागा मेडिकलच्या नावावर नाही. जिल्हाधिकारी मेडिकलच्या नावावर जागा न करता, बांधकामाला हरकत नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे; यामुळे पुढे बांधकामात अडचणी येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बैठकीत मेडिकलच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या नियोजनात ‘टाटा’चा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नुकताच त्यांना प्रस्तावित बांधकामाची माहिती पाठविण्यात आली आहे.
बांधकामाच्या प्रस्तावात बदल
बांधकामाचा निधी कमी असल्याने जुन्या प्रस्तावात बदल करण्यात आले आहेत. नव्या प्रस्तावानुसार तळमजल्यासह दोन मजल्यांची इमारत असणार आहे. यात तळमजल्यावर स्वागत कक्ष, रेडिओ थेरपीपासून ते पॅथॉलॉजी विभाग, कार्यालयीन विभाग व पाच खाटांचे आपत्कालीन विभाग असणार आहे. पहिल्या मजल्यावर, मेडिसिन, गायनॅक, सर्जरी व पेडिॲट्रिक कॅन्सर विभागाची ओपीडी, सेमिनार रूम, क्लास रूम, रुग्णांसाठी प्रतीक्षालय असणार आहे. तर दुसऱ्या मजल्यावर चार विभागांचे प्रत्येकी २० खाटांचे वॉर्ड, आयसीयू, डॉक्टरांच्या निवासासाठी कक्ष, भविष्यात होणारा ‘बोनमॅरो ट्रान्स्प्लांट’ कक्ष उभारला जाणार आहे.
- कॅन्सर हॉस्पिटल लवकरच उभे राहणार
विदर्भात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यात वाढ होत आहे. यामुळे मेडिकलमधील कॅन्सर हॉस्पिटल लवकर उभे करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘टाटा’च्या मदतीने कॅन्सर हॉस्पिटलचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंबंधित प्रस्ताव त्यांना पाठविला आहे.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल