लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर स्वरूपाच्या जळित रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणाने (होमोग्राफ्टिंग) त्यांचा जीव वाचविणे शक्य आहे. जळितांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी मेडिकलने ‘स्किन बँक’साठी पुढाकार घेतला. अखेर दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुढील आठवड्यापासून ही ‘बँक’ रुग्णसेवेत रुजू होत आहे. मध्य भारतातील शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच ही सोय उपलब्ध होणार आहे.
विदर्भात आगीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमधून येणारे अपंगत्व, विद्रूपपणा यांमुळे जळितांमधील आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. मनावरही याचा मोठा परिणाम होतो. शिवाय, त्वचेमुळे न्यूनगंडही निर्माण होतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी व गंभीर स्वरूपाच्या जळित रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणाने वाचविण्यासाठी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार यांच्या सहकाऱ्याने व रोटरी क्लब, ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि नॅशनल बर्न सेंटर, मुंबईच्या मदतीमुळे नागपुरात २७ फेब्रुवारी २०१४ रोजी पहिली त्वचा बँक सुरू झाली. परंतु ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा टक्का वाढला असला तरी अद्यापही त्वचादानाबाबत फारशी जागृती नाही. यामुळे अत्यल्प त्वचादान आणि ‘स्किन बँके’चा खर्च जास्त या व इतरही कारणांमुळे ऑरेंजसिटी रुग्णालयाने त्वचा बँक चालविण्यास असमर्थता दर्शवली होती. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने ही बँक मेडिकलला सुरू करण्याची विनंती केली. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी लागलीच याला होकार देत जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. यंत्रसामग्रीची दुरुस्ती करण्यात आली. कार्यरत अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी या ‘बँके’साठी इतरही सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. मेडिकलचे प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील व रोटरी क्लबच्या सहकार्यामुळे पुढील आठवड्यात ही बँक रुग्णसेवेत सुरू होत आहे.
स्किन बँकेचे महत्त्व मोठे
जळीत रुग्णांचे प्राण वाचविण्यासोबतच त्यांचे पुढील आयुष्य सुसह्य करण्यास स्किन बँकेचे महत्त्व मोठे आहे. यासाठी रोटरी क्लबच्या सहकार्याने मेडिकलने पुढाकार घेऊन या बँकेसाठी जागा व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या. पुढील आठवड्यात ही बँक रुग्णसेवेत सुरू होईल.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल