नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) रुग्णांना मोफत उपचाराचा नियम आहे. परंतु मेडिकलमध्ये ‘बीपीएल’ रुग्णांसाठी सीटी स्कॅन नि:शुल्क असले तरी त्याला लागणारे ‘डाय’ विकत आणण्यास सांगितले जात आहे. बाजारात याची किमत ८०० ते १४०० रुपयांपर्यंत असून, रुग्णांना पदरमोड करून हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये एकीकडे अद्यावत यंत्रणा व विविध विभाग उघडले जात असलेतरी गरीब रुग्णांच्या हक्काच्या सोयी उपलब्ध करून दिले जात नसल्याने आरोग्याची स्थिती बिकट होत चालली आहे. विशेष म्हणजे, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे दुसरे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलमध्ये दोन वर्षांपासून ‘एमआरआय’च नाही. यामुळे सीटी स्कॅनवर रुग्णांचा भार वाढला आहे. परंतु रुग्णांनाच ‘डाय’ व इतर साहित्य विकत आणण्यास सांगितले जात असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे.
- काय आहे ‘डाय’ इंजेक्शन
सीटी स्कॅनमध्ये आतील अवयव किंवा विशिष्ट भाग किंवा उती इत्यादींची प्रतिमा, एकाच भागाच्या वेगवेगळ्या कोनातून प्रतिमा घेतल्या जातात. शरीरात निर्माण झालेली रोगाच्या दृष्टिकोनातून असाधारण स्थिती साधारण स्थितीपेक्षा वेगळी दिसण्यासाठी विशिष्ट रसायनांचा उपयोग केला जातो. याला ‘डाय’ किंवा ‘कॉन्ट्रास्ट एजंट’ असेही म्हणतात. मेडिकलमध्ये ‘डाय’चा तुटवडा पडला आहे. ‘बीपीएल’ रुग्णांना सीटी स्कॅन नि:शुल्क असलेतरी त्यांना बाहेरून विकत घेणाऱ्या ‘डाय’साठी पैसे मोजावे लागत आहेत.
- दोन महिन्यापासून ‘डाय’ नाही
मेडिकलमध्ये सीटी स्कॅन किंवा एमआरआय करण्यासाठी आलेल्या ‘बीपीएल’ रुग्णासाठी स्थानिक पातळीवर डाय खरेदी करून तो पुरविण्याचे नियम आहेत. परंतु नियमांना बगल देत ‘बीपीएल’सह सर्वच रुग्णांना बाहेरून डाय खरेदी करण्यासाठी वेळेवर चिठ्ठी लिहून दिली जात आहे. काही गरीब रुग्णांना हा खर्चही झेपत नसल्याने ते सीटी स्कॅनपासून वंचित राहत असल्याचेही दिसून येत आहे.