लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या जगभर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील रुग्णांची संख्या आता वाढायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसी येथील आयआयटी (बी.एच.यू) आणि आयएमएसच्या विद्यार्थ्यांनी एक मॉडेल विकसित केले आहे. हे स्टार्टअप मेडिपॉर्ट कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांच्या स्थितीचा अंदाज घेऊन भविष्यात किती व्हेंटिलेटरची गरज लागेल, याचा अंदाज वर्तविणारे आहे. हे मॉडेल विकसित करणाऱ्यांमध्ये नागपुरातील जय नरेश धनवंत या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.जय हा वाराणसी आयआयटी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षाचा विद्यार्थी असून तो नागपुरातील वाडी नाका येथील रहिवासी आहे. आपल्या मॉडेल संदर्भात 'लोकमत'शी बोलताना तो म्हणाला, त्यांनी एका अमेरिकन कंपनीची मदत घेतली. अमेरिकेतील भारतीय शास्त्रज्ञ डॉ. आनंद देव आणि डॉ. गिरीश श्रीनिवासन यांचे देखील त्यांनी यासाठी सहकार्य मिळवले. त्याच्या तीन सहकारी मित्रांनी हे मॉडेल विकसित केले. स्टार्टअप आर्टिफिशियल इंटेलिजन्स/मशीन लर्निंग सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रामध्ये हे एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी मॉडेल ठरू शकते, असे तो म्हणाला.देशावरील कोरोनाचे संकट आणि व्हेंटिलेटरची अपुरी संख्या लक्षात घेता या विद्यार्थ्यांनी इटली, स्पेन, दक्षिण कोरिया, अमेरिका या देशातील रुग्णांच्या आकडेवारीचे तीन महिन्यापूर्वी अध्ययन केले. त्यानंतर हे मॉडेल विकसित केले. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोनामुळे संक्रमित झालेल्या किती रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडू शकेल, याचा अंदाज यावरून घेता येऊ शकतो, असा दावा या विद्यार्थ्यांने केला आहे. हे नि:शुल्क व्हेंटिलेटर प्रेडिक्टर कोरोना विरुद्धच्या लढाईत देशात महत्त्वाची भूमिका पार पडू शकते, असे तो म्हणाला.असे काम करते हे मॉडेलअत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेले हे रिस्क प्रेडिक्टर रुग्णाच्या लक्षणांचे विश्लेषण करून कोरोना संक्रमणाची शक्यता आहे अथवा नाही हे वर्तविते. यासाठी एका वेबसाईटवर जाऊन कुणीही व्यक्ती आपल्या आरोग्य संदर्भात प्राथमिक माहिती प्राप्त करून घेऊ शकतो. आपल्या रक्त चाचणीचा अहवाल त्यात सबमिट करून भविष्यात व्हेंटिलेटरची आवश्यकता पडेल काय, याचीही माहिती प्राप्त करू शकतो. उत्तर प्रदेश सरकार या मॉडेलचा उपयोग करीत असल्याचे जयने सांगितले.