हायकोर्टाची वडिलांपुढे अट : कर्तव्याची करून दिली जाणीव नागपूर : आईसोबत राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला नियमित भेटायचे असेल तर, पहिले तिला थकीत देखभाल खर्च द्यावा लागेल, अशी अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वडिलांपुढे ठेवली आहे. मुलीच्या सर्वांगीण विकासाकरिता तिला देखभाल खर्च देणे वडिलांचे कर्तव्य आहे, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. संबंधित मुलगी प्रतिभाचे वडील विजयानंद व आई कविता यांचा घटस्फोट झाला असून, दोघांनीही दुसरे लग्न केले आहे. दुसऱ्या लग्नापासूनही त्यांना अपत्ये आहेत. प्रतिभा आईसोबत राहत आहे. पहिली मुलगी असल्यामुळे प्रतिभावर आपले खूप प्रेम आहे. तिच्यासोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यासाठी तिला नियमित भेटणे गरजेचे आहे, असे वडील विजयानंदचे म्हणणे होते. असे असले तरी त्याने मुलीचा देखभाल खर्च थकीत ठेवला होता. परिणामी न्यायालयाने सुरुवातीला त्याला वडील म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यानंतर मुलीला भेटण्याची सशर्त परवानगी दिली. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. निर्णयानुसार, विजयानंद व प्रतिभा दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अकोला कुटुंब न्यायालयात दोन तासांसाठी भेटू शकतील. त्यांच्यासोबत समुपदेशक राहील. थकीत देखभाल खर्च पूर्णपणे अदा होतपर्यंत विजयानंदला प्रत्येक भेटीच्या वेळी कुटुंब न्यायालयात तीन हजार रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम जमा न केल्यास त्याला त्यापुढील महिन्यापासून प्रतिभाला भेटता येणार नाही. प्रतिभा व तिच्यासोबत येणाऱ्या एका व्यक्तीचा प्रवास खर्च विजयानंदला द्यावा लागेल. तसेच, त्याला काही कारणास्तव भेटीसाठी येणे शक्य न झाल्यास त्याची माहिती आधीच कविताला द्यावी लागेल.(प्रतिनिधी)
मुलीला भेटायचेय, पहिले देखभाल खर्च द्या!
By admin | Published: May 01, 2017 1:14 AM