स्थायी समिती अध्यक्षांची नोटीस : लेखी स्पष्टीकरण मागविले नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विना सूचना अनुपस्थित राहणाऱ्या तसेच विलंबाने येणाऱ्या १६ अधिकाऱ्यांना प्रशसाकीय शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी शुक्रवारी दिले. यामुळे महत्त्वाच्या बैठकांबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. स्थायी समितीच्या बैठकीला अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे बऱ्याचदा दिसून आले आहे. या पूर्वीचे स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी, अविनाश ठाकरे यांनी देखील बैठकांना विनापरवानगी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी कंबर कसली होती. मात्र, प्रशासनाच्या विनंती नंतर प्रकरण शांत झाले होते. आता पुन्हा जाधव यांनी त्याच कारणासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आता कारण द्यावे लागेल अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल. शुक्रवारी दुपारी ३ वाजता सिव्हिल लाईन्स मुख्यालयात स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. मात्र, अधिकारी वेळेत न पोहचल्यामुळे बैठक १० मिनिटे उशिरा सुरू करण्यात आली. बैठक सुरू झाल्यानंतर अर्धा तास होऊनही अधिकाऱ्यांचे येणे सुरूच होते. काही अधिकारी तर पूर्वसूचना न देता अनुपस्थित होते. प्रशसनातर्फे प्रमुख म्हणून अपर आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते. जाधव यांनी सांगितले की, आयुक्तांना बैठकीत येणे बंधनकारक नाही. मात्र, त्यानंतरही आयुक्तांनी ते सिमेंट रस्त्याच्या कामाच्या पाहणीसाठी जात असल्याचे कळविले आहे. मात्र, काही अधिकारी पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांकडून सात दिवसात स्पष्टीकरण मागविले जाईल. सतत बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी) मानधनावर नेमणार चौकशी अधिकारी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार स्तरावरील एक अधिकारी तीन वर्षांसाठी मानधनावर नियुक्त केला जाईल. स्थायी समितीने संबंधित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी एम.एस. केळवदकर हे चौकशी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता नव्याने मुलाखती घेऊन विशेष कार्य अधिकारी (चौकशी) नियुक्त केला जाईल. प्रथम १२ महिने व नंतर दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली जाईल. टीपी स्कीमचा प्रस्ताव परत मौजा चिचभवन व मौजा हुडकेश्वर-नरसाळाची टीपी स्कीम तयार करण्याचा प्रस्ताव नगर रचना विभागातर्फे स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. चिचभवनचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात करण्यात आला आहे. हुडकेश्वर व नरसाळाची टीपी स्कीम वेगवेगळी तयार करून सादर करावी, असे निर्देश संदीप जाधव यांनी नगर रचना अधिकाऱ्यांना दिले व संबंधित प्रस्ताव प्रशासनाला परत पाठविला. पुढील बैठकीत सविस्तर प्रस्ताव सादर केला जाईल.
बैठक टाळणे अधिकाऱ्यांना भोवणार
By admin | Published: March 25, 2017 2:46 AM