लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : गाेसेखुर्द प्रकल्पामुळे नागपूर जिल्ह्याच्या टाेकावर असलेल्या चिचघाट (ता. कुही) या गावाचे माैदा तालुक्यातील परमात्मा एक आश्रमाजवळ पुनर्वसन करण्यात आले. येथे रस्ते तयार करण्यात आले असून, यातील काही रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. त्यातच चिचघाट (पुनर्वसन) येथे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असून, विविध मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने येथील नागरिकांना राेज त्रास सहन करावा लागत आहे.
चिचघाटचे माैदा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आल्यानंतर, शासनाने या नवीन ठिकाणी सर्व मूलभूत सुविधांची निर्मिती करणे अपेक्षित हाेते. वास्तवात, या गावाच्या पुनर्वसनासाठी काेट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. यात घराच्या बांधकामासाेबत रस्ते तयार करण्यात आले असून, पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. पाण्याच्या वितरणासाठी पाईपलाईनही टाकण्यात आली. अंतर्गत रस्ते तयार करून गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटच्या नाल्याही तयार करण्यात आल्या.
अंतर्गत रस्त्याचे काम तीन वर्षापासून सुरू हाेते. त्यांना तीन महिन्यातच भेगा पडायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी राेडवर डांबर व गिट्टी निघत आहे. या राेडवरून अधूनमधून जड वाहतूक केली जात असल्याने, रस्ते खराब झाल्याची माहिती सुपरवायझर विक्रमसिंग यांनी दिली. दुसरीकडे, या रस्त्याचे काम निकृष्ट प्रतीचे करण्यात आले, असा आराेप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी तसेच या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
...
पिण्यासाठी क्षारयुक्त पाणी
चिचघाट (पुनर्वसन) येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले असून, पाण्याच्या वितरणासाठी गावात पाईपलाईनही टाकण्यात आली. परंतु, त्या टाकीत अद्यापही पाणी पाेहाेचविण्यात आले नाही. त्यामुळे कुणाच्या घरात नळाचे पाणी अद्याप पाेहाेचले नाही. परिणामी, येथील नागरिकांना बाेअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. ते पाणी क्षारयुक्त असल्याने नागरिकांना पाेटाचे आजार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.