अन् जाहीरनामा समितीच्या बैठकीतून के. राजू निघून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:28 AM2018-10-30T00:28:30+5:302018-10-30T00:29:49+5:30
अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समितीसमोर मत मांडण्यासाठी बोलाविलेल्या सुमारे १५० तज्ज्ञांपैकी फक्त चार-पाच तज्ज्ञ वेळेत पोहचले. तासाभरानंतरही असेच चित्र असल्याचे पाहून अ.भा. काँग्रेस समितीच्या जाहीरनामा समितीचे सदस्य के.राजू संतापले व बैठक सोडून हॉटेलमध्ये निघून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आधाराने काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसच्या जाहीरनामा समितीच्या बैठकीला बसला. समितीसमोर मत मांडण्यासाठी बोलाविलेल्या सुमारे १५० तज्ज्ञांपैकी फक्त चार-पाच तज्ज्ञ वेळेत पोहचले. तासाभरानंतरही असेच चित्र असल्याचे पाहून अ.भा. काँग्रेस समितीच्या जाहीरनामा समितीचे सदस्य के.राजू संतापले व बैठक सोडून हॉटेलमध्ये निघून गेले.
कोराडी रोडवरील हेरिटेज लॉन येथे जाहीरनामा समितीची दोन दिवसीय बैठक सोमवारपासून आयोजित करण्यात आली आहे. जाहीरनामा समितीचे सदस्य खा. राजीव गौडा यांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून या बैठकीसाठी नितीन राऊत व अमोल देशमुख यांच्यावर ‘की पर्सन’ म्हणून जबाबदारी सोपविली होती. या पत्रानंतर चव्हाण यांनी एक पत्र जारी करीत किशोर गजभिये यांना या बैठकीसाठी समन्वयक म्हणून नेमले. जाहीरनामा समितीसमोर आपली मते मांडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ बोलाविण्यासाठी केंद्र, राज्याने नेमलेल्या पदाधिकाऱ्यांना आपसात समन्वय साधायचा होता. तर शहर काँग्रेसला बैठक व भोजन व्यवस्था सांभाळायची होती. मात्र, गजभिये यांचे नाव येताच राऊत यांनी अंग काढून घेतले.
गजभिये यांनी भोपाळ, मेळघाट, गडचिरोलीसह विदर्भातील सुमारे १४० प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. सर्वच जण येतील असे गजभिये सकाळपासून सांगत होते. सकाळी ११ वाजता के.राजू हे बैठकीसाठी पोहचले. त्यांच्यासोबत नितीन राऊत होते. मात्र, बैठकीसाठी फक्त चार ते पाच प्रतिनिधीच आले होते. दुपारचे १२ वाजले तरी ही संख्या फारशी वाढली नाही. हा ‘पूअर शो’ पाहून के.राजू संतापले व नाराजी व्यक्त करीत हॉटेलमध्ये निघून गेले. यावेळी राऊत व अमोल देशमुख यांनी राजू यांच्यासोबत गाडीमध्ये जाण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, दोघांनाही सोबत न घेता ते एकटेच निघून गेले. शेवटी प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे हे के.राजू यांची समजूत घालण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. तोवर हॉल भरण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावण्याची जबाबदारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली. ठाकरे यांनी लागलीच कार्यकर्त्यांना मोबाईल केले व हॉल भरला. या घटनाक्रमानंतर नाराज झालेले के.राजू दुपारच्या सत्रासाठी परत आले. हॉल भरलेला पाहून सुखावले. आलेल्या निवडक तज्ज्ञांसह स्थानिक कार्यकर्त्यांनीही ‘तज्ज्ञ’ बनून भाषणे ठोकली. के. राजूंनीही मार्गदर्शन केले व जाहीरनामा समितीची पहिल्या दिवसाची बैठक पार पडली. यानंतर के.राजू हे पत्रकार परिषद घेणार होते, तसे निरोपही प्रसार माध्यमांना देण्यात आले होते. मात्र, आपण राहुल गांधी यांच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्ती असल्यामुळे पत्रकार परिषद घेणे योग्य होणार नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे वाघमारे यांच्यावर ती जबाबदारी सोपवून ते रवाना झाले, असेकाँग्रेसच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आजच्या बैठकीसाठी तज्ज्ञांची जुळवाजुळव
सोमवारच्या बैठकीत जाहीरनामा समितीसमोर मते मांडण्यासाठी तज्ज्ञ न पोहचल्यामुळे पोलखोल झाली. ही परिस्थिती पुन्हा आज, मंगळवारच्या बैठकीत निर्माण होऊ नये यासाठी रात्री नियोजन करण्यात आले. बाहेरून बोलाविलेल्या तज्ज्ञ प्रतिनिधींसोबतच स्थानिक तज्ज्ञांची यादी तयार करून त्यांना फोनवर निमंत्रण देण्यात आले.