काेंढाळी : नाभिक समाजबांधवांची चमेली (ता. काटाेल) येथील श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात विशेष सभा व एकदिवसीय कार्यशाळा साेमवारी (दि. १२) पार पडली. यात काेराेना संक्रमण काळात नाभिक समाजबांधवांचे झालेले नुकसान आणि त्यावर करावयाच्या उपाययाेजना, यावर विचारविनिमय करण्यात आला.
अध्यक्षस्थानी काटोल नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष मोहन निंबाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून दीपक कडूकर, अरुण उईके, राजेंद्र कावलकर, प्रशांत बाभूळकर, मोहन लक्षणे, मदन चव्हाण, नाना कळवे उपस्थित हाेते. संत नगाजी महाराज व संत सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. नाभिक समाज संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी शामराव कडू, भीमराव येवले, मारोतराव ससनकर यांचा गाैरव करण्यात आला. समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी संघटनेची स्थापना करणे, त्या माध्यमातून समाजबांधवांना मदत करणे, महामारी काळात कुटुंबीयांची सुरक्षितता व काळजी घेणे, ओबीसींना मिळणाऱ्या शासकीय याेजनांचा लाभ घेणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.