नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी नागपूर विभागाच्या दाैऱ्यावर येत आहेत. नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागातील खासदारांसोबत त्यांची बैठक पार पडणार असून या बैठकीतून या दोन्ही विभागाच्या रेल्वे विकासाचा रोड मॅप तयार होण्याचे संकेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाव्यवस्थापक लालवानी शुक्रवारी सकाळी ७.४० वाजता त्यांच्या जीएम स्पेशल ट्रेनने नागपूर स्थानकावर पोहचतील. त्यांच्यासोबत नागपूर आणि भुसावळ क्षेत्रातील रेल्वेच्या विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा राहील. येथील अधिकाऱ्यांशी सकाळच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही विभागातील खासदारांसोबत ते मंथन करतील. या बैठकीत खासदारांकडून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील रेल्वेची विकासकामे आणि प्रलंबित योजनांवर चर्चा होईल. काय समस्या आहे, काय अडचणी आहे, कुठे कसल्या अडचणीमुळे कोणते काम अडले आहे, त्याबाबतच्या माहितीचे आदानप्रदान या बैठकीत होईल. कोणत्या क्षेत्रात कोणती कामे कशी केली जावी यासंबंधीच्या सूचनाही खासदारांकडून ते ऐकून घेतील. त्या आधारे एक अहवाल तयार करून लालवानी तो रेल्वे बोर्डाला पाठवतील. सकाळी ७.४० ते रात्री १०.३० असा रेल्वे महाव्यवस्थापकाच्या नागपूर दाैऱ्याचा वेळ आहे. अर्थात ते शुक्रवारी येथे १४ तास ४० मिनिटे नागपुरात थांबणार आहेत. खासदारांसोबतची मिटिंग लवकर आटोपली गेल्यास ते आजबाजूच्या भागातील रेल्वेच्या विकास कामाची पाहणी करू शकतात.'जीएम स्पेशल'चा उत्साह नाहीविशेष म्हणजे, रेल्वेच्या महाव्यवस्थापक ज्या विभागात दाैऱ्यावर जातात, त्या विभागात एक वेगळा उत्साह असतो. कारण महाव्यवस्थाप दाैऱ्यावर जाताना एक पूर्ण विशेष रेल्वेगाडीच घेऊन जातात. या गाडीला 'जीएम स्पेशल ट्रेन' म्हटले जाते. गाडीचा तामझाम पाहण्यासारखा असतो. मात्र, महाव्यवस्थापक लालवानी नागपुरात येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असूनही स्थानिक अधिकाऱ्यांकडून तशी कोणतीही अधिकृत माहिती कळविण्यात आली नव्हती.