नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम टाऊन’ असलेल्या नागपूरवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात विशेष कृपादृष्टी दाखविली आहे. केंद्र सरकारची राष्ट्रीय औषध निर्माण शास्त्र संशोधन संस्था नागपुरात देण्यासह मिहान प्रकल्प व मेट्रो रेल्वेसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. आजवर एखाद दुसऱ्या बाबींवर समाधान मानावे लागणाऱ्या नागपूरकरांच्या झोळीत यावेळी मात्र बरेच काही आले आहे.मिहानसाठी २०० कोटी नागपूरसह विदर्भाचे औद्योगिक चित्र पालटण्याची क्षमता असलेल्या मिहान प्रकल्पाला लवकरात लवकर ‘टेक आॅफ’ करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मिहानचे भूसंपादन व पुनर्वसन यासाठी तब्बल २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांना त्यांच्या जमिनीचा व मालमत्तेचा मोबदला मिळणे तसेच दावे सेटल करण्यास मदत होईल. यातून प्रकल्पाला गती मिळेल. मेट्रो रेल्वेसाठी १९७ कोटीनागपूर मेट्रो रेल्वेची गती वाढविण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात १९७ कोटींची तरतूद केली आहे. नुकतेच केंद्र सरकारनेही अर्थसंकल्पात नागपूर मेट्रोसाठी निधी दिला होता. आता राज्य सरकारनेही आपल्या वाट्याच्या निधीची तरतूद केल्याने नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनला या निधीतून भूसंपादन, मेट्रो रेल्वेच्या मार्गाची प्रत्यक्ष आखणी याशिवाय प्रशासकीय पातळीवर प्रकल्पाला गती देणे शक्य होणार आहे. दीक्षाभूमी, ताजबाग, कोराडीचा विकासनागपूरच्या धार्मिक स्थळांच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. दीक्षाभूमी, ताजबाग व कोराडी देवी मंदिर परिसराचा विकास करण्याची योजना आखण्यात आली असून त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. ( विशेष पान २ वर)राष्ट्रीय औषध निर्माण शास्त्र व संशोधन संस्थानागपुरात एकामागून एक महत्त्वाच्या संस्था सुरू करण्याचा सपाटा अर्थसंकल्पातही कायम राहिला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषध निर्माण शास्त्र व संशोधन संस्थेचे केंद्र नागपुरात सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही घोषणा नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी असून औषध निर्मितीच्या क्षेत्राला बूस्ट देणारी आहे. नाशिक व औरंगाबादचे लोकप्रतिनिधी या संस्थेसाठी आग्रही होते. मात्र, शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचीच निवड केली. कामठीत डॉ. आंबेडकर स्मारककामठी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व प्रशिक्षण केंद्र तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सूतोवाच केले होते. संबंधित केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वस्तू, त्यांचे ग्रंथ व साहित्य उपलब्ध होईल. सीसीटीव्ही लागणारगेल्या काही दिवसांत नागपुरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर संवेदनशील शहर बनले आहे. नागपूरकरांची सुरक्षा विचारात घेता शहरातील चौकांमध्ये, महत्त्वांच्या वास्तूवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
उपराजधानीचे मेगा शायनिंग
By admin | Published: March 19, 2015 2:40 AM