नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांनी शिक्षण विभागाद्वारे वितरित करण्यात आलेल्या सायकलीचा लाभ आपल्याच सर्कलमधील विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला आहे. नागपूर पंचायत समितीअंतर्गत ९७ सायकलींसाठी लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली. यातील ८९ लाभार्थी सोनेगाव निपाणी या सर्कलचे आहेत. सभापतींनी आमच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनाही ठेंगा दाखविल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हा परिषद सेस फंड योजना २०२०-२१ अंतर्गत वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात येते. त्या अंतर्गत नागपूर पंचायत समितीमधील ९७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात ४८ विद्यार्थिनी व ४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूर पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषदेचे सहा सर्कल येतात. निवड करण्यात आलेल्या ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी हे सोनेगाव निपाणी या सर्कलमधील असल्याचा आरोप भाजपचे सदस्य सुभाष गुजरकर यांनी केला आहे. मार्च महिन्यात या लाभार्थ्यांची निवड झाली. निवड यादीचा हवाला देत गुजरकर म्हणाले की, ४८ विद्यार्थिनींपैकी फक्त चार विद्यार्थिनी वेगळ्या सर्कलच्या आहेत; तर ४९ विद्यार्थ्यांपैकी ४ विद्यार्थी हे वेगळ्या सर्कलचे आहेत. विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. सेस फंडाच्या योजनेसाठी सर्वच सदस्यांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण समितीकडे पाठविले होते; परंतु सभापतींनी लाभार्थ्यांची निवड करताना इतर सदस्यांना ठेंगा दाखविला.
- सर्व सदस्यांना समप्रमाणात सायकलींचे वाटप करायचे होते. सभापती म्हणून पाच-दहा सायकली त्यांनी जास्त नेल्या असत्या, तर हरकत नव्हती; पण सर्वच सायकली आपल्याच सर्कलमध्ये वळवून घेण्याचा हा प्रकार इतर सदस्यांना डावलण्याचा आहे. जिल्हा परिषदेत एक प्रकारे पदाधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून, हे खपवून घेतले जाणार नाही.
- सुभाष गुजरकर, सदस्य, जिल्हा परिषद