जलालखेडा : रोहणा-इंदरवाडा गट ग्राम पंचायतीचे सरपंच व सचिव मनमानी कारभार करत असल्याची तक्रार ग्राम पंचायत सदस्य संजय बडोदेकर यांनी नरखेडच्या खंड विकास अधिकाऱ्याकडे केली आहे. २९ मे रोजी सरपंच व सचिव यांनी दुपारी १२ वाजता मासिक सभेचे आयोजन ग्राम पंचायत कार्यालयात केले होते. ठरल्याप्रमाणे सर्व सदस्य सभेसाठी उपस्थित झाले; मात्र सचिव रुपेश पाखमोडे सभेला आले नाहीत. सदस्यांनी दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांची वाट पहिली; पण ते उपस्थित झाले नाही. त्याच दिवशी पं.स. सभापती नीलिमा रेवतकर यांनी आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीला सचिव गैरहजर होते. अशा महत्त्वाच्या बैठकीत सचिवांनी गैरहजर राहणे चुकी असल्याचा आरोप संजय बडोदेकर यांनी केला आहे, तसेच आलेल्या निधीच्या खर्चाचे विवरण विचारले असता, सचिव नेहमी टाळाटाळ करतात; तसेच सभेत चुकीचे ठराव घेऊन शासनाच्या निधीचा गैरवापर करीत आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून आठवडी बाजाराचा लिलाव न करता ग्राम पंचायत स्वतः वसुली करून त्याबाबतचा हिशेब मागितला असता देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही बडोदेकर यांनी केला आहे.
--
रोहना ग्रामपंचायतसंदर्भात ग्राम पंचायत सदस्याने दिलेल्या तक्रारीच्या काही प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून, राहिलेल्या प्रकरणांची चौकशी लवकरच करण्यात येणार आहे.
प्रशांत मोहोड, खंड विकास अधिकारी, नरखेड.
ग्राम पंचायत सदस्य बडोदेकर यांनी केलेले आरोप निरर्थक आहेत. मासिक सभेत आर्थिक खर्चाबाबतची माहिती सभेत सर्व सदस्यांना दिली जाते, तसेच कोरोना काळात मी दवाखान्यात भरती होतो. त्यामुळे ग्राम पंचायत येथे झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हतो.
रुपेश पाखमोडे, सचिव ग्राम पंचायत, रोहना.
---
बडोदेकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. कोरोनामुळे आठवडी बाजार भरण्यास शासनाने बंदी केली असल्यामुळे बाजार लिलावाचा प्रश्नच येत नाही, तसेच कसलेही चुकीचे ठराव घेण्यात आलेली नाही.
प्रमिला लोने, सरपंच, रोहणा.