शिक्षण समितीचा निर्णय : शिक्षणासह भौतिक सुविधांकडे देणार लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये आकांक्षा फाऊंडेशनच्या सहकार्याने सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या शाळातील सुविधा व देखरेखीसाठी शिक्षण समितीच्या सहा सदस्यांना प्रत्येकी एका शाळेचे पालकत्व देण्याचा निर्णय गुरुवारी शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती सुमेधा देशपांडे, सदस्या संगीता गिऱ्हे, डॉ. परिणिता फुके, सदस्य नागेश सहारे, मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, सुभाष उपासे, संजय दिघोरे, आकांक्षा फाऊंडेशनचे सोमसुर्व चॅटर्जी आदी उपस्थित होते. या शाळांमधून भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांसाठी खेळणी आदींची व्यवस्था व देखरेखीसाठी शिक्षण समितीच्या सहा सदस्यांना प्रत्येकी एका शाळेचे पालकत्व देण्यात आले आहे.
मध्य नागपुरातील स्व. गोपालरावजी मोटघरे (खदान) पूर्व नागपुरातील बाभुळबन, दक्षिण-पश्चिम नागपुरातील स्व. बाबुराव बोबडे, उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती, पश्चिम नागपुरातील रामनगर तर दक्षिण नागपुरातील रामभाऊ म्हाळगीनगर अशा सहा मनपा प्राथमिक शाळांमध्ये केजी वन व केजी टू करिता विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणालाही सुरुवात झाली असल्याची माहिती यावेळी शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.
....
जात प्रमाणपत्रासाठी झोननिहाय शिबिर
दहावीनंतर विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता पडते. यासाठी मनपाच्या दहा झोनमध्ये दहा जात प्रमाणपत्र शिबिर राबविण्यात येणार आहे. यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी झोनमधील मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र तयार करून देतील. यासाठी आवश्यक कागदपत्रे व सर्व माहितीही विद्यार्थ्यांना या शिबिरामधूनच मिळणार असल्याची माहिती यावेळी दिलीप दिवे यांनी दिली.