काटोल : तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या मेंढेपठार (बाजार) येथील महिला सरपंच दुर्गा चंद्रशेखर चिखले यांच्याविरोधात बंड पुकारत ग्रा.पं.सदस्यांनी अविश्वास पारित केला होता. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निदेर्शानुसार शुक्रवारी ग्राम विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात सदस्यांनी नाकारलेल्या सरपंचांना गावकऱ्यांनी मताधिकाराचा वापर करीत क्लीन चिट दिली. सरपंच दुर्गा चिखले यांच्याविरोधात अरुणा शिवदास गजभिये यांच्यासह चंद्रशेखर सुरेश कुंभलकर, हेमंत चिंतामण इंगळे,अंजू कांतेश्वर वसू, अभय नामदेव कोहळे, रंजू डोमा सर्याम यांनी काटोलच्या तहसील कार्यालयात अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत चिखले यांच्या विरोधात अविश्वास ठरावसुद्धा पारित झाला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी मेंढेपठार येथे बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान पार पडले. गावातील ७६७ पैकी ६६२ मतदारांनी यात मतदानाचा हक्क बजावला. यात अविश्वास ठरावाच्या बाजूने ३२१ तर विरोधात ३२३ मते पडली. दोन मतांनी अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्याने चिखले यांना अभय मिळाले. १८ मतदारांचे मतदान मान्य करण्यात आले नाही. मतपत्रिकांची दोनदा मतमोजणी करण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय धापके यांच्या उपस्थितीत या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
सदस्यांनी नाकारले मात्र गावकऱ्यांनी स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:39 AM