लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड/बेला) : तालुक्यातील बेला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा ज्ञानेश्वर उकुंडे यांच्या विरुद्ध २२ जानेवारी रोजी १६ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. अविश्वास ठराव पारित होताच जिल्हाधिकारी कार्यालयाने २३ जानेवारीला निवडणुक प्रक्रियेची अधिसूचना जारी केली. उकुंडे या थेट मतदारांमधून निवडून आल्याने ग्रामसभेच्या माध्यमातून गुप्त मतदानाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ग्रामसभेने सरपंच सुनंदा उकुंडे यांना भरघोस मतदान करीत ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव फेटाळला. एकूण ६,५४७ मतदार असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये २,५१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ठरावाच्या बाजूने ४३० तर विरोधात २,००० मते पडली. सरपंच सुनंदा उकुंडे यांच्या बाजूने निकाल जाहीर होताच जल्लोष साजरा करण्यात आला. एकूण ८५ मते बाद ठरविण्यात आली. बेला ग्रामपंचायतीमध्ये एकूण १७ सदस्य असून थेट जनतेमधून सरपंच निवडून आलेल्या आहेत. दोन वर्षानंतर एकूण १६ सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केल्यानंतर शुक्रवारी सकाळी ९ वाजता ग्रामसभेचे आयोजन केल्या गेले. या ग्रामसभेत गुप्त मतदान पद्धतीने मतदानाचा निर्णय घेण्यात आला. मतदानासाठी एकूण सहा मतदान केंद्र सज्ज करण्यात आली होती. मतदान होणार असल्याची बाब समोर येताच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सरपंच विरूद्ध अविश्वास ठरावाकरिता संमती नाही (ठरावाच्या विरूद्ध बाजूने) असे नमूद करण्यात आले होते. दुसरीकडे सरपंचाच्या अविश्वासाकरिता ठरावाची संमती आहे (ठरावाच्या बाजूने) अशाप्रकारे नमूद केल्या गेले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी सुरेश कोल्हे यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.