नागपूर : वर्धा राेडवरील साई मंदिराचे संचालन करणाऱ्या साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या ११,७३६ सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. मात्र ही कारवाई अवैध असून ट्रस्टच्या सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याचा काेणताही अधिकारी सहआयुक्तांना नाही, असा आराेप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.
सह धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयामुळे साईबाबांच्या भक्तांत नाराजी पसरली असल्याची भावना पवार यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. त्यांनी सांगितले, पाच वर्षांपूर्वी नवीन सभासदांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी साईबाबांची सेवा व्हावी या उद्देशाना या साईभक्तांनी १ लाख, १० हजार व १ हजार रुपये भरून नोंदणी केली व सभासद झाले. मात्र ट्रस्टचे अविनाश शेगावकर यांनी आक्षेप घेतला हाेता. हे प्रकरण कोर्टात पोहचले व सभासदांना पुढील निवडणुकीच्या वेळी मतदानाचा अधिकार दिला जावा असे आदेश दिले. यानंतर तत्कालीन सह धर्मादाय आयुक्त यांनी सभासदांची नोंदणी वैध असल्याचा आदेश दिला. आता पुन्हा निवडणूक हाेणार आहे. अशावेळी शेगावकरांचा आक्षेप गृहीत धरत सह धर्मदाय आयुक्त आभा काेल्हे यांनी पूर्ववती अधिकाऱ्यांना कायद्याची माहिती नसल्याचे कारण सांगून त्यांचे आदेश रद्द केले व ११७३६ सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याचा नव्याने आदेश काढला. काही थाेड्याच लाेकांना नाेटीस पाठविले. नियमावलीचे पालन करण्यात आले नाही. ट्रस्टच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी ट्रस्टवर ताबा हवा आहे. सहाआयुक्तांनी कुणाच्या तरी दबावामुळे सदस्यत्व रद्द केले असून यात माेठा भ्रष्टाचार झाल्याचा आराेप पवार यांनी केला.
या प्रकरणात सरकारने लक्ष घालून रद्द केलेल्या सभासदांचे सदस्यत्व बहाल करावे व ताेपर्यंत ट्रस्टीची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात यावी तसेच सह धर्मदाय आयुक्तांची हकालपट्टी करावी अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. पत्रपरिषदेला सचिव अरुण वनकर, विजयकुमार शिंदे, माहिती कार्यकर्ते टी. एच. नायडू, मिलिंद महादेवकर व रवींद्र इटकेलवार उपस्थित होते.