लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता डझनभर पक्ष निवडणुकीत दिसतात. स्वातंत्र्यानंतर मात्र दोनच पक्षात निवडणुका व्हायच्या. त्यातही कॉँग्रेस याच पक्षाचे उमेदवार निवडून यायचे. तेव्हाचे उमेदवारही चारित्र्यवान होते. इंग्रज राजवटीत त्यांनी भोगलेल्या अत्याचारामुळे ते राष्ट्रप्रेमी होते अशा हृद्य स्मरणांमध्ये रमलेले ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वर गिºहाठे यांनी जुन्या काळातील निवडणुकांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याची जाणीव त्यांना होती. स्वातंत्र्य टिकले पाहिजे ही भावना उमेदवाराबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात दारू, पैसा याला थाराच नव्हता. दमलेल्या कार्यकर्त्यांना कच्च्या चिवड्यानेही ऊर्जा मिळायची. उलट तेव्हा घरातील ज्येष्ठ मंडळी घरच्या लष्कराच्या भाकरी खाऊन नोकरी करू नये, असे राजकारणात येणाऱ्यांना म्हणायचे. आज अगदी चित्र उलट आहे. राजकारणातून मिळणारी प्रतिष्ठा, सवलत, संपत्ती यामुळे जुन्या काळी असलेले निवडणुकीचे पावित्र खऱ्या अर्थाने हरविले आहे. तेव्हाचा प्रचारही आजसारखा नव्हता. उमेदवार घरोघरी जाऊन, प्रत्यक्ष मतदाराला भेटून आपण निवडणुकीत का उभे आहोत, याबद्दल सांगायचा. त्याकाळी काँग्रेस पक्षाचे निवडणुक चिन्ह बैलजोडी होते. त्यामुळे प्रचाराचे साधनही बैलगाडीच असायचे. याशिवाय सोंगाडे, दंडारमध्ये काम करणारे कलावंत उमेदवाराचा प्रचार करायचे. मतदानाच्या एक दिवसापूर्वी कोतवालाकडून गावात दवंडी दिली जायची. त्याकाळी आचारसंहिता नसली तरी, शिस्त होती, भीती होती. तहसिलदार आणि ठाणेदाराचा दरारा होता. निवडणुकीत जातीपातीचे राजकारणच नव्हते. उमेदवारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती होती असे ते पुढे म्हणाले.
आठवणीतील निवडणूक; कच्च्या चिवड्याने मिळायची ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:27 AM