बाजारात प्लॅस्टीकच्या फुलांची आवक वाढल्याने पारंपरिक फुलांना सध्या ग्रहण लागले आहे. प्लास्टिक फुलांमुळे पारंपरिक फुलांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. हुबेहूब फुलांसारख्या दिसणार्या कधीच न सुकणार्या तसेच वर्षानुवर्षे वापरता येणार्या प्लास्टिकच्या फुलांच्या माळा ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागल्याने पारंपरिक फुलांच्या मागणीत 50 ते 60 टक्के घट झाली आहे. त्यामुळेच, माजी गृहमंत्री दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनस्थळी भेट घेतली.
नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालावी. शेतकरी जे फुल पिकवत आहेत त्याला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी रोहित पाटील यांनी केली आहे. तसेच, यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचेही रोहित पाटील यांनी म्हटले. दरम्यान, याचवेळी अधिवेशनठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही भेट घेत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केल्याचं पाटील यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
मार्गशीर्ष महिन्यात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मार्गशीर्ष गुरुवार, लग्नसमारंभ अनेक कार्यक्रम याच महिन्यात असतात. त्यामुळे सजावटीसाठी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्लास्टिक फुलांमुळे पारंपरिक फुलांची मागणी कमी झाली आहे. बाजारात फुलं, वेणी, हार, तोरण, फुलांच्या माळा, आंब्याच्या पानांची डहाळी वापरण्यात येणाऱ्या फुलांची प्लास्टिक फुलं बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे फुलांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, यापूर्वीही माजी खासदार राजू शेट्टी यांनीही प्लॅस्टीक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तर, यासंदर्भात एका फूल उत्पादक शेतकऱ्याने न्यायालयात धावही घेतली आहे. आता, रोहित पाटील यांनीही याविषयाकडे लक्ष वेधले असून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे.