नागपूर : अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना ओळखत नाही, असा महाराष्ट्रात कोणी नाही. त्यांच्या संघर्षावर आधारित चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच त्यांचे खडतर आयुष्य जनसामान्यांपर्यंत पोहचले होते. सात-आठ वर्षांपूर्वी नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या सत्काराचा सोहळा पार पडला होता. त्यावेळी सिंधूताईंनी आपली झोळी पसरली आणि नागपूरकरांनी भरभरून त्यांची झोळी भरली होती.
सिंधूताई सपकाळ यांचा जन्म वर्धा येथील. अनेक संकटे पेलत, संघर्ष करत त्यांनी अनाथांचा विडा उचलला. त्यांचे नागपूरला सत्कार-सोहळ्यानिमित्त येणे-जाणे असायचे. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांच्या सत्काराचा असाच एक कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. सिंधूताईंना ऐकण्यासाठी या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सिंधूताईंनी अनाथांसाठी आपला पदर झोळी म्हणून व्यासपीठावरूनच उपस्थितांपुढे केला. तेव्हा सभागृहात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हाती जी येईल ती वस्तू त्यांच्या झोळीत अर्पण केली होती. त्यात अनेकांच्या हातची अंगठी, गळ्यातील माळ, पैसा आदींचा समावेश होता. सिंधूताईंच्या कार्याला यावेळी नागपूरकरांकडून अशी भरघोस साथ मिळाली होती.
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात त्या एका पुस्तक प्रकाशनाला आल्या होत्या. त्यानंतर कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊन लागल्याने, त्यांचा हा नागपुरातील शेवटचाच कार्यक्रम ठरला.
७२ व्या वाढदिवसानिमित्त ७२ दिव्यांचे औक्षण
१४ नोव्हेंबर २०१९ रोजी सिंधूताईंनी वयाची ७२ वर्षे पूर्ण केली होती. त्याच पार्श्वभूमीवर कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात आयोजकांकडून त्यांना सुवासिनींकरवी ७२ दिव्यांनी ओवाळून औक्षण करण्यात आले होते. हा अनुपम सोहळा आजही अनेकांच्या स्मरणात आहे.