नागपूर: स्त्रियांपेक्षा पुरुषांनाच ‘सेक्शुअॅलिटी’ अर्थात लैंगिकतेबाबत शिकवण्याची अधिक गरज आहे, कारण त्यांच्यावर कायम ‘परफॉर्मन्स प्रेशर’चा पगडा असतो, असे निरिक्षण नोंदवून ज्येष्ठ सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजय देशपांडे यांनी पती-पत्नीमध्ये लैंगिकतेबाबत अधिक मोकळेपणाने संवाद होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रुबरू ह्यूमन लायब्ररीच्या कार्यक्रमात ते ‘ह्यूमन बुक’ म्हणून, 'आपण सेक्सॉलॉजिस्ट कसे झालो', हा प्रवास सांगत होते.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम करताना, त्यांना एकदा नर्सिंग कॉलेजमध्ये ‘ह्यूमन सेक्शुअॅलिटी’ या विषयावर व्याख्याने देण्यासाठी बोलावण्यात आले होते. तोपर्यंतच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात हा विषय विशेषत्वाने अभ्यासला गेला नसल्याने, काय बोलायचे असा प्रश्न पडला. त्यासाठी डॉ. गुप्ता यांच्या काही नोट्स वाचल्या व त्यातून या विषयाबद्दल माहिती मिळत गेल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे मेडिकलच्या 'सेक्स अॅन्ड मॅरेज कौन्सिलिंग' या विभागात काम करण्याचा योग आला. तिथे कोणीही येत नसे. यासंदर्भात अजून काही प्रयत्न केल्यानंतर पेशंटस येऊ लागले आणि मग त्या विभागात थोडी गर्दी दिसू लागल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे २००३ पासून सेक्सॉलॉजिस्ट म्हणून स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केल्यानंतरही पेशंटस कमी असायचे. सेक्शुअॅलिटीबद्दल समस्या असलेल्या पेशंटला दोन मुख्य समस्या असतात. पहिली शारीरिक व दुसरी मानसिक. यातल्या मानसिक बाबीवर आपण जास्त भर दिला असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेऊन अध्ययन व संशोधन केल्याचे त्यांनी विशद केले. आपल्याकडे येणाऱ्या दांपत्यांमध्ये तरुण व मध्यम वयातील जोडप्यांचा समावेश अधिक असतो. यात पुरुषांमध्ये परफॉर्मन्स प्रेशर असते तर स्त्रियांमध्ये संकोच असतो असे नेहमीच आढळून येते. त्यामुळे पुरुषांना त्याबाबत अधिक शिकवण्याची गरज आहे हे वारंवार निदर्शनास येत असल्याचे ते पुढे म्हणाले.
यासाठी ‘सेक्शुअॅलिटी’चे शिक्षण गरजेचे आहे. हे शिक्षण म्हणजे ‘सेक्स’ कसा करायचा याची माहिती नसून, आपल्या लैंगिकतेविषयीची व आपल्या जोडीदाराच्या लैंगिकतेविषयीची जाण असणे होय. शहरी जोडप्यांपेक्षा ग्रामीण व आदिवासी जोडप्यांमधील लैंगिकतेची जाण अधिक चांगली असल्याचे मतही त्यांनी यावेळी नोंदवले. कार्यक्रमाचे संचालन व डॉ. संजय देशपांडे यांचा परिचय डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी करून दिला. डॉ. प्रफुल्ल कंटक यांनी आभार मानले.