- कोरोनाचा काळ पडतोय भारी : मेंटल स्ट्रेसमुळे वाढतोय ताणतणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणापासून अनेक समस्यांना प्रारंभ झाला आहे. अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाला आणि आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. जिथे आर्थिक गणिते कोलमडतात, तिथे व्यवहाराची घडी विस्कटायला लागते. यातून निर्माण होणाऱ्या ताणतणावातून कौटुंबिक सलोखाही लोप पावत असतो. अशा वेळी संवाद हे अत्यंत महत्त्वाचे औषध ठरते. त्यामुळे, कुठल्याही परिस्थितीत कौटुंबिक म्हणा वा व्यावहारिक पातळीवरील संवाद जपणे महत्त्वाचे ठरते.
-----------
तणावाची लक्षणे
- अचानक राग येणे, नैराश्य, भीती वाटणे.
- पोटाचे विकार सुरू होणे. त्यात आम्ल वाढणे, बद्धकोष्ठता होणे, आतड्यांतील जळजळीचे विकार, हृदयात जळजळ होणे, वायूचे विकार.
- पाठदुखी, डोकेदुखी, जबड्यातील वेदना, अस्थिसंबंधतातील समस्या.
- उत्तेजित होणे, चक्कर येणे, खूप घाम येणे, हातपाय गारठणे, श्वसन समस्या, रक्तदाब वाढणे, हात-तळहाताला घाम येणे.
----------
अल्पकालीन तणावाची लक्षणे
- आक्रमकता, अधीरता, साधारणत: शत्रुत्वाची भावना, अंतरंगातील भीती.
- सगळ्यांची न संपणारी भीती, नकारात्मकता, अविश्वासाचा भाव.
- उच्च रक्तदाब, छातीत दुखणे, मायग्रेन, हृदयाच्या समस्या.
-----------
तीव्र लक्षणे
- सतत मूल्यांकन होत असल्याची भावना.
- पूर्णवेळ उत्कृष्ट दिसण्याचा प्रयत्न करणे.
- अनुभवत असलेल्या दीर्घकालीन तणावांची अनभिज्ञता.
- हृदयाचे आजार, हृदयरोगाचे झटके, कर्करोग होण्याच्या संभावनेत वृद्धी होणे.
- हिंसक व आत्महत्येची वृत्ती बळावणे.
- दीर्घकालीन तणावांमुळे गंभीररीत्या कोलमडणे.
----------
तणावावरील उपचार
तणावावर उपचार करणारी विशेष अशी कोणतीही औषधे नसली तरी निद्रानाश, भीती, नैराश्य, पोटाशी संबंधित आजारांवर औषधे दिली जाऊ शकतात. समुपदेशन किंवा संवाद हा महत्त्वाचा उपचार ठरतो. स्ट्रेस कमी करण्यासाठी योगासने, ॲक्युपंक्चर, अरोमाथेरपी महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेष म्हणजे, तणावापासून मनाला डायव्हर्ट करण्यासाठी मनोरंजन उत्तम माध्यम ठरू शकते. सिनेमा बघणे, विनोदी कार्यक्रमाचा आनंद घेणे, गायन-वादन आदींमध्ये मन रमवणे.
-------------
भीती वाटणे, ही मानसिक तणावाची सुरुवात
मानसिक तणाव वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे स्ट्रेस, एंग्झायटी, सिजोफेमिया आदी. या सर्वात प्रमुख लक्षण ही भीतीच असते. ती कोणत्याही प्रकारची असू शकते. आर्थिक गणित काेलमडले की व्यवसाय, कुटुंब कसे चालवायचे, हप्ते कसे भरायचे, भविष्य कसे असेल अशा अनेक संभावनेने तणावात वृद्धी होत जाते. त्यामुळे, जिथे समस्या असेल तिथे संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तो कुटुंब म्हणा किंवा व्यावसायिक असो, संवाद साधा आणि मार्ग काढा आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- डॉ. अविनाश जोशी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ
............