नागपूर : पौंगंडावस्था म्हणजे आयुष्यातील असा काळ ज्यामध्ये मुले लहानही नसतात आणि मोठेही. नेमक्या याच वयात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे त्यांच्या मनात प्रश्नांचे काहुर माजलेले असते. त्यात जीवघेणी शैक्षणिक स्पर्धा, वाढलेला ‘स्क्रीन टाइम’ परिणामी मुलांमध्ये नैराश्य व चिंतेचे प्रमाण वाढत आहे. साधारण १०० पैकी १० ते १५ किशोरवयीन मुलांमध्ये हा मानसिक आजार दिसून येत आहे, अशी माहिती अॅडोलेसंट हेल्थ अकॅडमी, नागपूर शाखेच्या माजी अध्यक्ष डॉ. मंजूषा गिरी यांनी दिली.
‘अॅडोलेसंट हेल्थ अकॅडमी’, नागपूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा १२ फेब्रुवारी रोजी ‘आयएमए’ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अकॅडमीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रवीण डहाके, सचिव डॉ. दिनेश सरोज, उपाध्यक्ष डॉ. मीना देशमुख, पुढील वर्षीचे अध्यक्ष डॉ. लिनेश यावलकर व ‘टीन क्लब कमिटी’चे सदस्य डॉ. अविनाश गावंडे उपस्थित होते.
-आत्महत्या प्रवृत्तीने वाढवली चिंता
मुले तासनतास मोबाइलवर गेम खेळतात, नको त्या ‘साइट’ पाहतात परिणामी त्यांच्यामध्ये आत्महत्या प्रवृत्ती वाढलेली असून चिंतेचे कारण ठरत आहे. अभ्यासात ते कमी पडत आहे. अलीकडे या वयोगटात ‘रॅश ड्रायव्हिंग’मुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही वाढल्याचे डॉ. गिरी यांनी सांगितले.
-सात ते आठ वयोगटात मासिक पाळी
साधारण ११ ते १३ व्या वर्षांपर्यत मुलींमध्ये पहिली मासिक पाळी येते. परंतु काही मुलींमध्ये सात ते आठ वयोगटातच येते. या मागे बदलेली जीवनशैली, आहारात जंक फूडचे वाढलेले सेवन व इतरही वैद्यकीय कारणे आहेत. कमी वयात ‘पॉर्नग्राफी’चे व्यसन जडलेली मुलेही दिसून येत आहेत. याचा प्रभाव मानसिकतेवर होत असल्याचे डॉ. गिरी म्हणाल्या.
-१०० शाळांमध्ये जनजागृती
नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रवीण डहाके म्हणाले, अकॅडमीतर्फे किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणासह आरोग्याच्या प्रतिबंधात्मक विषयाच्या जनजागृतीवर भर दिला जाईल. यासाठी १०० शाळांमधील शिक्षक व पालकांसाठी परिषद आयोजित केली जाईल. किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण फारच कमी आहे. ते वाढविण्याची गरज असल्याचेही डॉ. डहाके म्हणाले.