लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : दिवसभर मुसळधार पाऊस बरसल्याने हिंगणा नजीकच्या वेणा नदीला पूर आला आणि नदीच्या पात्रात असलेल्या श्री राधाकृष्ण मंदिरात एक मनाेरुग्ण व्यक्ती अडकली. पाेलिसांनी एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल)च्या जवानांच्या मदतीने त्या व्यक्तीला पुरातून सुखरूप बाहेर काढले.
मुन्ना गुलाब बानिया (५०, रा. रायपूर, ता. हिंगणा) ही व्यक्ती मनाेरुग्ण असल्याने परिसरात फिरत असते. तो गुरुवारी दुपारी वेणा नदीच्या मध्यभागी असलेल्या श्री राधाकृष्ण मंदिरात झाेपला हाेता. दुपारी २ वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळाने नदीला पूर आला. मंदिराच्या छतापर्यंत पुराचे पाणी चढू लागले. त्याचवेळी मुन्नाला जाग आली. मुन्ना मंदिरात अडकला असल्याचे लक्षात येताच नदीच्या तीरावरील नागरिकांनी लगेच पाेलिसांना सूचना दिली.
त्याला पुरातून सुखरूप काढणे आपल्याला शक्य नसल्याचे लक्षात येताच ठाणेदार सारीन दुर्गे यांनी एसडीआरएफच्या जवानांना पाचारण केले. माहिती मिळताच एसडीआरएफचे पोलीस उपनिरीक्षक अजय काळसर्पे, सुजित जंबेली यांच्या नेतृत्वात २३ जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही जवान माेटरबाेटच्या मदतीने पुरात शिरले. त्यांनी ती बाेट मंदिराच्या छताजवळ नेली. ताेपर्यंत मुन्ना मंदिराच्या छतावर चढला हाेता. त्याला छतावरून व्यवस्थित बाेटीत बसविले आणि सुखरूप तीरावर आणले. दुपारी ३ वाजता सुरू झालेले हे बचाव कार्य सायंकाळी ६ वाजता संपले. हे कार्य बघण्यासाठी नदीच्या तीरावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली हाेती.