सहा नगरसेवक वाढले : शेवटचा प्रभाग तीन सदस्यांचा कमलेश वानखेडे नागपूरराज्य सरकारने नागपूर महापालिकेत चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रभाग रचनेत महापालिकेत सहा नगरसेवक आणखी वाढणार आहेत. नगरसेवकांची संख्या १४५ वरून १५१ होणार आहे. वाढीव लोकसंख्या व नव्या वस्त्यांचा शहरात समावेश होणार असल्याने ही संख्या वाढणार आहे. यामुळे राजकीय पक्षांनाही आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन खूश करण्याची संधी मिळणार आहे.हुडकेश्वर- नरसाळा या भागाचा समावेश नव्यानेच नागपूर शहरात करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात दोन नगरसेवक वाढतील.यापूर्वीची प्रभाग रचना २००१ च्या लोकसंख्येनुसार करण्यात आली होती. त्यामुळे नगरसेवकांची संख्या १४५ वर पोहोचली होती. आता तर २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना होणार आहे. वाढीव लोकसंख्येमुळे नगरसेवकांची संख्या वाढून १५१ होणार आहे. प्रत्येकी चार सदस्यांचे ३७ प्रभाग होतील. शेवटचा प्रभाग ३ सदस्यांचा असेल. ५० टक्के महिला आरक्षणामुळे प्रत्येक प्रभागात दोन महिला सदस्य असतील व शेवटच्या तीन सदस्यांच्या प्रभागातही दोन महिला सदस्य राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकारतर्फे लवकरच अधिसूचना जारी होणार असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. सध्या दोन नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. चार सदस्यांचा प्रभाग करायचा असल्याचे सध्या असलेले दोन प्रभाग एकत्र केले जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जवळपास सर्वच प्रभागांच्या भौगोलिक रचनेत काहीअंशी बदल होणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या दोन सदस्यीय प्रभाग रचनेत शेवटच्या जयताळा प्रभागात तीन सदस्य आहेत. यापूर्वी महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना महाल दक्षिणामूर्ती चौक हा शेवटचा प्रभाग ठरला होता व तेथे चार सदस्य आले होते. आता नवीन प्रभाग रचना ‘क्लॉक वाईज’ होते की ‘झिग झॅग’ पद्धतीने, यावर बरेच काही अवलंबून आहे. अधिकृत ‘अ’ दर्जासह फायदेही मिळणारनगरसेवकांची संख्या १५० पेक्षा जास्त झाली तर संबंधित महापालिकेला राज्य सरकारतर्फे ‘अ’ दर्जा दिला जातो. महापालिकेत १४५ नगरसेवक असतानाही राज्य सरकारने गेल्या वेळी महापालिकेला ‘अ’ दर्जा देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. मात्र, त्याचे फारसे फायदे महापालिकेला मिळाले नाहीत. आता नगरसेवकांची संख्या १५१ होणार असल्यामुळे महापालिकेला अधिकृतपणे ‘अ’ दर्जा मिळेल व त्याचे सर्व फायदेही मिळतील. भाजप खूश, काँग्रेसचे मंथन चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मिळाल्याने भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पक्ष व संघटनेच्या बळावर आता निवडणूक जिंकणे सोपे होईल, असा दावा भाजप नेते करीत आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचे या विषयावर मंथन सुरू असून नफा-तोट्याचा हिशेब मांडला जात आहे. अपक्ष नगरसेवकांमध्ये नाराजी असून राष्ट्रवादी व शिवसेनेने तर या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे.
मनपात १५१ नगरसेवक
By admin | Published: May 13, 2016 3:09 AM