अंबाझरीत पुन्हा गँगवार : कुख्यात बग्गाच्या खुनाचा बदला, नऊ जण अटकेत नागपूर : जुन्या वैमनस्यातून गुंडांनी एका डेकोरेशन संचालकाचा खून केला. ही घटना अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील मरारटोली वस्ती रामनगर चौक येथे बुधवारी घडली. दीड महिन्यापूर्वी झालेल्या कुख्यात नीलेश ऊर्फ बग्गा कौरती याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून झाल्याचे सांगितले जाते. दिवसाढवळ्या झालेल्या या खुनामुळे अंबाझरी परिसरात पुन्हा एकदा गँगवार भडकल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. खुशाल ऊर्फ प्रवीण कुहिके (३३) रा. तेलंगखेडी असे मृताचे नाव आहे. बग्गा याचा १६ डिसेंबर रोजी मरारटोलीत खून करण्यात आला होता. बग्गाच्या खुनात बाबल्याला अटक करण्यात आली होती. सर्व आरोपी तुरुंगात आहेत. एकाच वस्तीत राहात असल्याने खुशालचीही आरोपींसोबत जुनी मैत्री आहे. खुशालचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तो बग्गाच्या खुनाच्या आरोपींना न्यायालयात पेशी असताना भेटायला जात होता. त्यामुळे बग्गाचा साथीदार पवन शेरेकर खूप संतप्त होता. खुशाल आरोपीला जामिनावर सोडविण्यास मदत करीत आहे, असा त्याला संशय होता. त्याने बग्गाचे वडील आणि आपले साथीदार पलास चौधरी, अजय ऊर्फ चिडी मेश्राम, संजू तभाने, जेम्स यांना खुशालबाबत सांगितले. यानंतर सर्व जणांनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच बग्गाचे वडील खुशालच्या घरी आले होते. तेव्हा ते खुशालला धडा शिकवण्याची धमकी देऊन गेले होते. खुशालने याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी १०.३० वाजत खुशाल शिव मंदिर येथून बुलेटने परतत होता. पवन शेरेकर, पलास चौधरी, अजय ऊर्फ चिडी मेश्राम, संजू तभाने आणि जेम्स आदींनी त्याचा पाठलाग केला. तो छोटा रामनगर चौकात पोहोचताच खुशालच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. खुशाल बुलेटसह खाली पडला. जखमी अवस्थेतही खुशालने स्वत:ला सांभाळले आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागला. परंतु हल्लेखोरांनी पाठलाग करून पुन्हा त्याला पकडले. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून त्याच्या शरीरावर शस्त्रांनी सपासप वार केले. त्याचा खून करून आरोपी फरार झाले. घटनेच्या वेळी छोटा रामनगर चौकात खूप गर्दी होती. पाहता-पाहताच परिसरातील दुकाने बंद झाली. घटनेची माहिती होताच अंबाझरी पोलीस तसेच खुशालचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळापासून थोड्या दूर अंतरावरच आरोपींची कुऱ्हाड सापडली. झोन दोनचे डीसीपी कलसागर, ठाणेदार प्रसाद सबनीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ धरपकड मोहीम राबवित पवन शेरेकर, जेम्स सिंह ऊर्फ टकली, जयेश आत्राम आणि आकाश नेवारेला ताब्यात घेतले. रात्री उशिरा पोलिसांनी पलाश चौधरी, अजय मेश्राम, आकाश सावलिया, विशाल, विठ्ठल करोतीसह एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले. पोलीस बग्गाच्या वडिलाचीही विचारपूस करीत आहे. काही दिवसांपूर्वीपासून अंबाझरी पोलीस ठाणे परिसरात खुनाचे सत्र सुरू आहे. १६ डिसेंबरला बग्गाचा खून करण्यात आला होता. बग्गा गुन्हेगार सचिन सोमकुवरचा साथीदार होता. सचिनचाही चार महिन्यापूर्वी गोकुळपेठ बाजारात पोलीस चौकीसमोरच गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. सचिनच्या खुनात भाड्याचे गुन्हेगार वापरण्यात आले होते. परंतु या खुनाचा पत्ता लावण्यात पोलिसांना यश आले नाही. सचिनचा खून करणारे आरोपीसुद्धा जामिनावर बाहेर येण्याच्या तयारीत आहेत. ते बाहेर येताच अंबाझरी परिसरात पुन्हा गँगवार भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खुशालच्या खुनामुळे परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
रामनगर चौकात व्यापाऱ्याचा खून
By admin | Published: February 02, 2017 1:54 AM