लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोमीनपुरा येेथे बुधवारी लॉकडाऊनचा विराेध करीत असलेल्या स्थानिक दुकानदारांचा राग तहसील पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर निघाला. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मोमीनपुऱ्यातील चुडी गल्लीत तहसीलचे पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख यांच्या अभद्र व्यवहारामुळे संतापलेल्या स्थानिक दुकानदारांनी त्यांना घेरले. मारामारीपर्यंत गोष्ट गेली. परंतु, काही लोकांनी मध्यस्थी करीत पोलीस कर्मचाऱ्यास तेथून बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोमीनपुरा येथील दुकानदार युनियन लॉकडाऊनचा विराेध करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर काही लोक आपली दुकाने उघडू लागली, तर काही दुकाने साफसफाईसाठी उघडण्यात आली होती. यादरम्यान पोलीस कर्मचारी शेख हे मोमीनपुरा येथे लस्सी विकत असलेल्या एका वृद्धास शिवीगाळ करू लागले. यानंतर दुसरा एक पोलीस कर्मचारी मोबाईल दुकानदारासह अभद्र व्यवहार करू लागला तसेच इतर दुकानदारांसोबतचही दादागिरी करीत चुडी गल्लीत पोहोचला. पोलिसांच्या या व्यवहाराने संतापलेल्या दुकानदारांनी पोलीस कर्मचाऱ्यास घेरले. पाहता-पाहता वाद वाढला. दुकानदारांचे म्हणणे होते की, लॉकडाऊन लागल्यापासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यवहारामुळे दुकानदार त्रस्त होते. त्यामुळेच वाद वाढला.
चौकट
मोठ्या हॉटेलवर पोलीस मेहरबानी
नागरिकांचे म्हणणे आहे की, मोमीनपुरा परिसरात अनेक हॉटेल रात्रभर सुरू असतात. त्यांच्यावर पोलिसांची मेहरबानी आहे. दुसरीकडे लहान दुकानदारांना त्रास दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी गरीब नवाज मशीदजवळ याच पोलीस कर्मचाऱ्याने एका टपरीवरील सामान फेकले होते. त्याचप्रकारे दुकानदारांचे सामान फेकणे, शिवीगाळ करणे, पैसे मागणे या कारणांमुळे दुकानदार त्रस्त आहेत.
चौकट
दुकानदारांना शिवीगाळ करणे, पैसे मागणे बरोबर आहे का?
मोमीनपुरा दुकानदार ट्रेडर्स असोसिएशनचे माजी सचिव व कपडा व्यवसायी जावेद अहमद अंसारी यांनी सांगितले की, लॉकडाऊन दरम्ययान दुकानदारांना त्रास देणे, शिवीगाळ करणे आणि अभद्र व्यवहार होत असल्यामुळेच लोक संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर संतापले होते. दुकानदारांचे सामान फेकणे आणि पैशाची मागणी करणे रोजचीच बाब झाली होती. एका पोलीस कर्मचाऱ्याचे असे वागणे बरोबर आहे का? त्यामुळे दुकानदारही संतापले होते.
चौकट
दुकानदारांना रोजच त्रास दिला जात होता
मोमीनपुरा दुकानदार ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष व स्थानिक दुकानदार जावेद अख्तर यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे अगोदरच लोक आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत कुणा दुकानदाराने साफसफाईसाठी दुकान उघडले तरी त्याला पोलीस कर्मचारी धमकावू लागले. लॉकडाऊनमध्ये तर दुकानदारांना रोजच त्रास दिला जात आहे. वयोवृद्ध नागरिकांना शिवीगाळ करणे आणि कुणावरही हात उगारणे हे तर पोलिसांसाठी रोजचीच बाब झाली आहे. सहनशक्तीचीही एक सीमा असते. अभद्र व्यवहारामुळेच दुकानदारांनी पोलीस कर्मचाऱ्यास घेरले.
कोट
व्यवहार चांगला नाही, पण पैशांची गोष्ट चुकीची आहे
कॉन्स्टेबल समीर शेख यांच्या व्यवहारामुळे दुकानदारांमध्ये रोष आहे. परंतु, पैसे मागण्याची गोष्ट बिलकूल चुकीची आहे. लोकांचा काही गैरसमज झाला होता. त्यामुळे वाद वाढला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध मिळालेल्या तक्रारीबाबत विचार केला जाईल.
- जयेश भंडारकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गांधीबाग