लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांपूर्वी सुरू झालेला नवतपा यंदा ढगांच्या आड सुरू असला तरी या ऊन-सावलीच्या वातावरणातही नागपूरसह विदर्भात सर्वच ठिकाणचा पारा गेल्या २४ तासांत वाढला आहे. गडचिरोली आणि ब्रह्मपुरी या ठिकाणी पाऱ्याने उडी घेतली असून, नागपुरातही २.६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
नागपुरातील वातावरण आजही काही प्रमाणात ढगाळलेले होते. तरीही उष्णतामान मात्र वाढलेलेच होते. दिवसभरात ४२ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. कालच्यापेक्षा यात २.६ अंशाने वाढ झाली आहे. सकाळी आर्द्रता ४२ टक्के नोंदविण्यात आली, तर सायंकाळी ३९ टक्के होती. दिवसभर उकाडाही चांगलाच जाणवत होता.
विदर्भात ब्रह्मपुरीमधील तापमान ४३.४ अंश असे सर्वाधिक राहिले. कालच्यापेक्षा येथे ४.३ ने वाढ झाली. या खालोखाल चंद्रपुरातील तापमान ४३.२ होते. तेथेही कालच्यापेक्षा पारा ३.८ ने वाढलेला होता. या सोबतच नागपूर ४२, अकोला ४२.४, अमरावती ४१.२, यवतमाळ ४१.५, वर्धा ४१.६, वाशिम ३९ आणि बुलढाणा येथे सर्वात कमी म्हणजे ३८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
दरम्यान, हवामान विभागाने २८ आणि २९ या दोन दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विजेचा गडगडाट आणि गारांसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. ३० तारखेलासुद्धा सर्वच ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.