नागपूर : अर्धा हिवाळा लाेटूनही थंडीचा पुरेसा अनुभव न घेतलेल्या नागरिकांना अखेर हुडहुडी भरायला लागली आहे. दाेन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली असून, सायंकाळपासून गारठा वाढायला लागला आहे. विदर्भात १२.६ अंशासह गडचिराेली सर्वाधिक थंड शहर ठरले. नागपूरचे किमान तापमान १३.६ अंश नाेंदविण्यात आले.
२४ तासात जम्मू व आसपासच्या परिसरात वेस्टर्न डिस्टरबन्स व सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. यासाेबतच हरियाणा व शेजारील क्षेत्रातही सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. त्यामुळे पूर्वाेत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विभागाच्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस वातावरण काेरडे राहणार असून, परिस्थिती स्थिर राहणार आहे. दरम्यान, उत्तरेकडील हवामानाचा विदर्भावरही परिणाम जाणवत आहे. दाेन दिवसांपासून आकाश निरभ्र असल्याने थंडी वाढायला लागली आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही भागात किमान तापमानात सामान्यपेक्षा अधिक म्हणजे १ ते ३ अंशाची घट हाेणार आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा अधिक घसरण हाेणार आहे.
मागील ४८ तासांत रात्रीच्या किमान तापमानात ३ ते ४ अंशाची घसरण झाली आहे. त्यामुळे सायंकाळी ६ पासून थंडीचा जाेर वाढायला लागला आहे. शिवाय दिवसाच्या कमाल तापमानातही घसरण झाली असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवत आहे. बुधवारी नागपूरचे कमाल तापमान १.५ अंशाच्या घसरणीसह २७.४ अंश नाेंदविण्यात आले. गडचिराेलीनंतर गाेंदिया येथे रात्रीचे किमान तापमान १२.८ अंश नाेंदविण्यात आले. गाेंदियात दिवसाचे तापमानही २७ अंशासह सर्वात कमी हाेते. अकाेला (१७.१), बुलडाणा (१६.८) व वाशिम (१५ अंश) मध्ये किमान तापमान अधिक हाेते. दरम्यान, बहुतेक जिल्ह्यांत कमाल तापमानात घसरण झाल्याची नाेंद आहे. पुढचे काही दिवस वातावरण काेरडे राहणार असल्याचे थंडी अधिक वाढणार आहे.