नागपूर : गेले काही दिवस विदर्भवासियांना उन्हाचे तीव्र चटके देणाऱ्या सूर्याची वाट दाेन दिवसापासून आकाशात जमलेल्या ढगांनी राेखली. ढगाळ वातावरणामुळे पारा काही अंशी कमी झाला आहे पण याचा दिलासा मिळण्याऐवजी लाेकांना वाढलेल्या उकाड्याने त्रस्त केले आहे. त्यात रात्रीच्या तापमानाने उसळी घेतल्याने दमट उष्णतेने निघणाऱ्या घामाच्या धारांमुळे नागरिकांची चिडचिड वाढवली आहे.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्याचा पारा शनिवारी ढगाळ वातावरणामुळे खाली आला. शुक्रवारी ४० अंशाच्यावर असलेले नागपूरचे कमाल तापमान शनिवारी ३९.२ अंशावर आले. अकाेला ४२ अंशावरून ४०.७ अंशावर खाली आले. चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदियाचे कमाल तापमान ४० अंशाच्या खाली आले. ब्रम्हपुरीत सर्वाधिक ४१ अंशाची नाेंद झाली, तर त्याखालाेखाल वर्धा ४० व यवतमाळ ४०.५ अंशावर आहे. दिवसाचे तापमान घटले असले तरी रात्रीचे मात्र ३ ते ४ अंशाने उसळले आहे. नागपूर २५.२, ब्रम्हपुरी २६.५, अकाेला २५.८, वर्धा २६.४, गाेंदिया २५.१, बुलढाणा २५.८ तर गडचिराेलीत २४ अंश किमान तापमानाची नाेंद करण्यात आली आहे. ३१ मार्चलासुद्धा असेच वातावरण राहण्याचा पण त्यानंतर पारा चढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दिवसा उष्ण लाट व उष्ण रात्रीचा अंदाजहवामान विभागाने विदर्भासह मध्य भारतात पुढचे दाेन दिवस म्हणजे १ एप्रिलपर्यंत उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. यासह रात्रीचा पारा वाढणार असून उष्ण रात्रीचाही अंदाज दिला आहे. तापमान २ ते ४ अंशापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.