लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील तीन दिवसांपासून विदर्भात थंडीचा कडाका वाढत आहे. पारा सातत्याने घसरत चालल्याने रात्री रस्ते लवकरच सुनसान पडत आहेत.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडी वाढायला लागली आहे. नागपुरातही गेल्या २४ तासात पारा ०.७ ने खाली घसरला. यवतमाळ जिल्ह्यात पारा अधिकच खालावला आहे. तिथे २.२ ने पारा घसरल्याची नोंद घेण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही थंडी जोर धरायला लागली आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर थंडी वाढायला लागल्याने शेतमालासाठी हे चांगले संकेत आहेत. कोरोनाचा कहर सुरू असतानाच थंडीही वाढत आहे. अशातच थंडीच्या लाटेमध्ये कोरोना वाढणार असल्याच्या चर्चा जोर धरत असल्याने नागरिक मात्र धास्तावले आहेत.
ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटायला लागल्या आहेत. शहरातही चौकामध्ये काही ठिकाही असे दृश्य दिसत आहे. येत्या आठवड्यात थंडी पुन्हा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असल्याने स्वेटर, ऊबदार कापडांच्या खरेदीसाठी नागिरकांची गर्दी वाढत आहे. यंदा कोरोनाच्या काळात थंडीपासून बचाव करण्यासाठी माणसे अधिकच दक्ष दिसत आहेत.
शहर कमाल किमान
नागपूर ३०.७ १२.५
चंद्रपूर ३०.० ८.६
अकोला ३२.० १३.१
अमरावती ३१.४ १२.८
गडचिरोली २९.२ १३.८
वर्धा ३०.० १३.६
यवतमाळ ३०.० १०.५