नागपूर : नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या हिवाळ्याने आता रंग दाखवायला सुरुवात केली आहे. नागपूरसह विदर्भात गारठा वाढला आहे. रविवारी नागपुरात रात्रीचा पारा २ अंशांनी खाली घसरून १३ अंशांवर पाेहोचला. त्यामुळे थंडीची तीव्र जाणीव व्हायला लागली आहे. दिवसाचे तापमान मात्र ३० अंशांवर कायम आहे.
२४ तासांत किमान तापमान १५ अंशांवरून १३ अंशांवर पाेहोचले, जे सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी कमी आहे. नागपूर आणि यवतमाळ सर्वात थंड शहर ठरले. नाेव्हेंबर महिन्यात नागपुरात सरासरी १५.८ अंश तापमानाची नाेंद हाेते. १९१२ साली ताे ६.७ अंशांपर्यंत खाली गेला हाेता. नाेव्हेंबर महिन्यात रात्रीचे तापमान दिवसागणिक घसरत जाते. मात्र, १५ अंशांपर्यंत मर्यादीत असते. यावेळी दुसऱ्याच आठवड्यात ते १३ अंशांवर घसरले आहे.
हवामान विभागाच्या बुलेटिननुसार, जम्मू-काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेशात एकाच वेळी पाऊस आणि बर्फवृष्टीचे वातावरण असल्याने, त्याचा प्रभाव उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात दिसत आहे. रात्रीचा पारा २ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. अकाेला (१७), वाशिम (१७) व चंद्रपूर (१६.४) वगळता, इतर जिल्ह्यांत तापमान १५ व त्याच्या खाली घसरले आहे. नागपूरनंतर गाेंदिया (१३.६), वर्धा (१४.४) व अमरावती येथे १४.८ अंशांसह थंड शहरे हाेती. चंद्रपुरात सकाळी ६६ टक्के नाेंदविलेली आर्द्रता सायंकाळी १८ टक्क्यांपर्यंत खाली आली. नागपुरात ६२, वर्धा ४२, अकाेला ४९, अमरावती ५५, तर गडचिराेली ५१ टक्के आर्द्रता नाेंदविण्यात आली. पारा घसरल्याने दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) ४ ते १० किलाेमीटरवर आली आहे. पुढच्या काही दिवसांत वातावरण असेच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.