तापमान १४.२ अंशावर : पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज नागपूर : जानेवारी महिन्याच्या शेवटासोबतच उपराजधानीतील पारासुद्धा हळूहळू वर चढू लागला आहे. यामुळे थंडीचा जोर अचानक कमी झाला असून, तापमानात वाढ होत आहे. यातच रविवारी नागपुरात किमान १४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासोबतच पुढील आठवडाभरात तापमानात पुन्हा दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच विदर्भातील अन्य जिल्ह्यातील पारासुद्धा सामान्यापेक्षा वर चढला आहे. यात अकोला येथील किमान तापमान चक्क १७.४ अंशावर पोहोचले आहे. तसेच गोंदिया १३ अंशासह सर्वात थंड राहिले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या वातावरणात कोरडे वारे वाहत आहे. तसेच वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत असल्याने पारा हा वर चढत आहे. यामुळे सध्या तरी पारा हा खाली घसरण्याची कोणतीही स्थिती दिसून येत नाही. जानेवारीच्या शेवटी एक-दोन दिवस थंडीचा जोर असू शकतो. मात्र त्यानंतर तापमानात सतत वाढ होईल. रविवारी उपराजधानीतील कमाल तापमान सामान्यापेक्षा दोन अंशाने अधिक म्हणजे, ३२.२ अंश सेल्सिअस राहिले. दुपारी ऊन तापल्याने संपूर्ण वातावरण गरम झाले होते. बुलडाणा येथे किमान १७.२ अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे १७ अंश, चंद्रपूर व वर्धा १६ अंश, ब्रम्हपुरी १५.७ अंश आणि अमरावती व वाशिम येथे १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पारा चढला; थंडी पळाली
By admin | Published: January 23, 2017 1:49 AM