नागपूर : नागपूरसह विदर्भातील वातावरण सध्या कोरडे आहे. यामुळेच दिवसाचे नागपुरातील तापमान २४ तासात १ अंशाने खालावून ३०.७ अंश सेल्सिअसवर घसरले आहे. येत्या दोन दिवसात पारा पुन्हा खालावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वेधशाळेच्या अंदाजानुसार, बंगालच्या खाडीतील दक्षिण पूर्व व दक्षिण पश्चिम भागात मंगळवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. पुढील २४ तासात तो पुढे सरकण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम दक्षिण भारताच्या सीमावर्ती क्षेत्रावर तसेच श्रीलंकेवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे चक्रीवादळही निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मध्य भारतावरील अवकाशात त्याचा परिणाम होऊन ३ डिसेंबरपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नागपुरात मंगळवारी चांगले ऊन पडले होते. वातावरणही स्वच्छ होते. मात्र सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ७२ टक्के होती, तर सायंकाळी त्यात घट होऊन ५३ टक्के झाली. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा सामान्यापेक्षा १ किंवा २ अंशाने अधिक होता. येत्या दिवसात त्यात घट होण्याचा अंदाज आहे.