नागपूर : रात्रीचे किमान तापमान चढण्याचे सत्र साेमवारी थांबले व घसरणीला सुरुवात झाली. ही घट काही अंशांची असून अजूनही तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, यानंतर घसरण हाेऊन थंडीत वाढ हाेईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
साेमवारी नागपूरचे किमान तापमान १३.८ अंश नाेंदविण्यात आले. २४ तासांत ०.५ अंशांची घट झाली; पण सरासरीपेक्षा ते ०.४ अंश अधिक आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यात पारा काही अंशाने खाली आला. ११.५ अंशांसह गाेंदियात सर्वांत कमी तापमानाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर, गडचिराली, वर्ध्यात पारा सरासरीपेक्षा वर आहे. अकाेल्यामध्ये २४ तासांत पारा २ अंशांनी वाढून १५.२ अंशांवर पाेहोचला. अमरावतीत मात्र किमान तापमान १३ अंशांवर कायम आहे, जे सरासरीपेक्षा कमी आहे. चंद्रपूरला सर्वाधिक १६.२ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, दिवसाच्या पाऱ्यामध्ये साेमवारी हलकी वाढ नाेंदविण्यात आली. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली वगळता सर्वत्र कमाल तापमान सरासरीच्या अधिक आहे.
दरम्यान, नव्याने तयार झालेल्या पश्चिमी झंझावातामुळे उत्तर भारतात हिमालयाच्या क्षेत्रात प्रभाव पडत आहे. १८ ते २० जानेवारीपर्यंत हा प्रभाव राहणार आहे. विदर्भात तापमान सरासरीत असले तरी मध्य व पश्चिम महाराष्ट्रात तापमानात माेठी घसरण झाली आहे व काही दिवस कडाक्याची थंडी जाणवणार आहे.