लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचल्याने आता एप्रिल महिन्यातील अंदाज यायला लागला आहे. हा महिनादेखील चांगलाच ताप वाढविणारा असेल, असे स्पष्ट संकेत आतापासून मिळायला लागले आहेत. आधीच तापणाऱ्या उपराजधानीतील जनतेला यंदाचा उन्हाळा चांगलाच जड जाणार, असे दिसायला लागले आहे.
होळीचा सण झाल्यापासून शहरातील तापमान चांगलेच वाढले आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात तीन-चार दिवस पाऊस आल्याने वातावरणात चांगलाच बदल जाणवायला लागला होता. मात्र ढग ओसरताच आणि आकाश नीरभ्र होताच गेल्या दोन-तीन दिवसापासून उन्हाचा कडाका वाढला आहे. सूर्य आतापासूनच आग ओकायला लागल्यासारखा अनुभव येत आहे. मागील ४८ तासात शहरातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे.
बुधवारचा रेकॉर्ड
हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राच्या नोंदीनुसार, ३० मार्च हा दिवस यंदाच्या वर्षात आतापर्यंत सर्वाधिक तापमानाचा राहिला. ४१.९ अंशावर पारा पोहचला होता. बुधवारी ०.८ अंशाची घट होऊन ४१.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापूर्वी सोमवारी २९ मार्चला ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मागील आठवडा तसा पावसाळी वातावरणाचा गेला. २३ मार्चला चांगलाच पाऊस झाल्याने तापमान २४.९ अंशावर आले होते. २४ तारखेला त्यात वाढ होऊन ३५.६ अंशावर तापमान पोहचले. त्यानंतरचे तीन दिवस ढगाळी वातावरण असल्याने तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशावरच होता. मात्र मागील दोन दिवसात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.
असा राहील आठवडा
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च ते ४ एप्रिल या काळात आकाश नीरभ्र ते आंशिक ढगाळलेले वातावरण राहील. मात्र उष्णतामान आत्यंतिक राहील, असा अंदाज आहे. या काळात कमाल तापमान ४०.२ ते ४१.८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३५ टक्के आणि दुपारची १० ते १५ टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.वाऱ्याचा वेग ७ ते ११ किलोमीटर प्रतितास राहणार असल्याने उन्हाच्या झळा जाणवणार आहेत. ८ एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.