चेक झाले बाऊन्स : दिवसभर कार्यालय बंदनागपूर : चित्रांश कंपनीच्या लाभार्थ्यांनी सोमवारी पुन्हा कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. कंपनीचे कार्यालय दिवसभर बंद होते. त्यामुळे लाभार्थी डीसीपी कार्यालयात पोहचले. कंपनीने दिलेले चेक वटले नसल्याने ३ मार्च रोजी लाभार्थ्यांनी सदरच्या श्रीराम टॉवर येथील कार्यालयात हंगामा केला होता. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना चेक दिले होते. तेही चेक बाऊन्स झाले आहे. दुकानांमध्ये टीव्ही संच लावून, त्यातून जाहिरातीचे प्रक्षेपण करून, त्या मोबदल्यात दुकानमालकांना महिन्याला सात हजार रुपये देण्याची योजना चित्रांश टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनी शहरात राबवित आहे. गेल्या दोन महिन्यापासून काही लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही. काहींना दिलेले धनादेश बाऊन्स झाले. काहींचे ३५००० घेऊनही टीव्ही लावले नाही. या तक्रारी घेऊन शेकडोच्या संख्येने लाभार्थी कार्यालयात पोहचले. मात्र दिवसभर कार्यालय बंद असल्याने सर्व लाभार्थी सदर पोलीस ठाण्यात पोहचले. तिथे समाधान न झाल्याने, त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे तोंडी तक्रारी केल्या. महिन्याभरापासून कंपनीचे अधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याची ओरड लाभार्थ्यांनी केली. पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लाभार्थ्यांचा आहे. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास ७० हजार लाभार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीने सुरुवातीला नियमित पैसे दिले. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. दिलेले चेकही बाऊन्स होत आहे. (प्रतिनिधी)
चित्रांशच्या कार्यालयावर लाभार्थ्यांचा गोंधळ
By admin | Published: March 17, 2015 1:57 AM