लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील आदर्श प्राचार्य पुरस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळावा यासाठी अर्ज करणाऱ्यांनी सत्य लपविले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनादेखील तक्रार करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना याची माहिती होती, परंतु तरीदेखील त्यांनी संबंधित व्यक्तीलाच पुरस्कारासाठी निवडले, असादेखील आरोप वर्धा येथील महादेवराव शेंडे यांनी पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे.
विद्यापीठात २६ जानेवारीला आदर्श पुरस्कारांचे वितरण झाले व शिक्षक-प्राचार्यांचा सन्मान करण्यात आला. वर्धा येथील बजाज विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओम महोदया यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निवडीवर शेंडे यांनी आक्षेप घेतला आहे. पुरस्कारासाठी दावेदारी करत असताना त्यांनी चुकीची माहिती दिली. विद्यापीठाने त्याची चाचपणी न करताच पुरस्कारासाठी त्यांची निवड केली, असा आरोप शेंडे यांनी केला आहे. यासंदर्भात डॉ. महोदया यांना संपर्क केला असता त्यांनी या आरोपांचे खंडन केले. पुरस्कार कुणाला द्यायचा आहे याचा निर्णय विद्यापीठाद्वारे गठीत समिती करते. समितीच्या शिफारशींच्या आधारावर पुरस्कारासाठी निवड होते, असे ते म्हणाले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी वर्धा येथील महादेवराव शेंडे यांची यासंदर्भातील तक्रार मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील चौकशीसाठी संबंधित विभागाला तक्रार पाठविण्यात येईल व तक्रारीतील दावे किती खरे आहेत, याची चाचपणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.