लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : स्थानिक नगर परिषद प्रशासनाने कळमेश्वर-ब्राह्मणी शहर सुंदर, स्वच्छ व पर्यावरणमुक्त करण्याचा निर्धार केला असून, त्यादिशेने वाटचाल सुरू केली आहे. यासाठी प्रशासनाने शहरातील जलकुंभावर आकर्षक चित्रे रेखटली असून, त्या चित्रांच्या माध्यमातून ‘करा याेगा, रहा निराेगी’ हा महत्त्वाचा संदेश देत जनजागृती करण्याचा उपक्रम राबविला आहे. दूरवरून दिसणारी जलकुंभावरील ही चित्रे सर्वांच्या आकर्षणाची केंद्र ठरली आहेत.
कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा या अभियानात सहभागी झाले आहे. त्याअनुषंगाने कळमेश्वर-ब्राह्मणी शहर सुंदर व स्वच्छ तसेच प्रदूषण व कचरामुक्त करण्याचा मानस पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासाठी प्रशासनाला स्थानिक नागरिकांची मदत व सहकार्य अपेक्षित आहे. त्यातूनच पालिका प्रशासनाने शहरातील जलकुंभावर याेगा तसेच पर्यावरणाचे महत्त्व विशद करणारी आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. ही चित्रे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, शहरातील नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी, कळमेश्वर-ब्राह्मणी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे तसेच नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष स्मृती ईखार यांनी केले आहे. कळमेश्वर ब्राह्मणी शहरात विविध प्रकारे स्वच्छता अभियान राबविणे सुरू करण्यात आले आहे. यात स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे तसेच स्वत: सहभागी हाेऊन शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन पालिकेच्या उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे यांनी केले आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा’ या मोहिमेंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यासाठी चित्र रेखाटण्यात आले आहेत. बदल्यात जीवनशैलीत नागरिकांना विविध व्याधींना सामोरे जावे लागते. त्यासाठी ‘करा योगा, रहा निरोगी’ हा संदेश देण्यात येत असून ‘ग्लाेबल वार्मिंग’चे दुष्परिणाम टाळण्यासाठी पर्यावरण जनजागृती होण्यासाठी वसुंधराचे रक्षण व वृक्षसंवर्धन करण्यासाठी या चित्राचा उपयोग होईल. शिवाय या अभियानात नागरिकांचा सहभाग वाढेल, अशी अपेक्षा पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी व्यक्त केली.
...
ग्रीन सिटीचा उपक्रम
कळमेश्वर-ब्राह्मणी शहर सुंदर, स्वच्छ तसेच प्रदूषण व कचरामुक्त करण्यासाेबतच हिरवेगार (ग्रीन) करण्याचा निर्धारही पालिका प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमात स्थानिक नागरिकांचा सहभाग असणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान, हरितक्रांती शपथ, वायुप्रदूषण कमी करण्यासाठी ‘नाे व्हेईकल डे’ सायकल फेरी, पर्यावरण रक्षण तसेच ग्रीन सिटीच्या उद्देशाने वृक्षाराेपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविले जात आहे.