नागपूर : डेटा सायन्स आर्किटेक्ट प्रोग्राम कोर्ससाठी शैक्षणिक कर्जाऐवजी परस्पर पर्सनल लोन काढून फिर्यादीसह १५ जणांची ३७.६६ लाखांनी फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गिकलर्न एज्युटेक सर्व्हिसेसच्या ‘एमडी’विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौरव नागेंद्रकुमार श्रीवास्तव (वय ३९, रा. ग्रीन फिल्ड २, वानाडोंगरी, डी मार्टजवळ) यांना डेटा सायन्स आर्किटेक्ट प्राेेग्राम कोर्स करायचा होता. त्यांना हा कोर्स गिकलर्न एज्युटेक सव्हिसेस प्रा. लि. या कंपनीच्या वेबसाईटवर दिसल्याने त्यांनी नोंदणी केली. त्यानंतर कंपनीने त्यांना संपर्क साधून कोर्ससाठी २.७८ लाख शुल्क लागेल. कंपनी त्यांच्या फायनान्स पार्टनरकडून शैक्षणिक कर्ज काढून देईल तसेच कंपनीकडून स्टायपेंड देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. घेतलेल्या कर्जाची ३६ महिने किस्त भरावी लागेल. २४ महिन्यांच्या आत जॉब मिळाल्यास लोनची उर्वरित रक्कम विद्यार्थी भरतील व जॉब न मिळाल्यास पूर्ण रक्कम कंपनी भरेल, अशी माहिती श्रीवास्तव यांना देण्यात आली.
त्यानंतर कंपनीने श्रीवास्तव यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, लाइव्ह फोटो, बँकेचे स्टेटमेंट, डिजिटल स्वाक्षरी आदी माहिती ऑनलाइन घेऊन करारनामा केला. परंतु, कंपनीने शैक्षणिकऐवजी अधिक व्याज दराने पर्सनल लोन घेऊन रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर कंपनीने कोर्स बंद करून स्टायपेंड देणे बंद केले. कर्ज घेतलेल्या फायनान्स कंपनीने लोनच्या ईएमआयसाठी श्रीवास्तव यांच्याकडे तगादा लावणे सुरू केले. श्रीवास्तव यांच्या प्रमाणेच कंपनीने १५ जणांकडून ३७ लाख ६६ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. श्रीवास्तव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गिकलर्न एज्युटेक सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड, बंगळुरू या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कमलापुरम श्रीनिवास कल्याण यांच्या विरूद्ध कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
...............