- कोरोना इफेक्ट : प्रतिदिवस ५६ हजार प्रवाशांचा रेकॉर्ड भूतकाळात गेला
आनंद शर्मा / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे नागपूरची शान म्हणून नावरूपास आलेला नागपूर मेट्रो प्रकल्प घसरलेल्या प्रवासी संख्येचा सामना करत आहे. सद्य:स्थितीत मेट्रोला दररोज एक हजारपेक्षाही कमी प्रवासी लाभत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी मेट्रोने एका दिवसात ५६ हजार प्रवाशांचा रेकॉर्ड नोंदवला होता.
कोरोना संक्रमणामुळे गेल्यावर्षी लागू झालेल्या टाळेबंदीत मेट्रोची ऑरेंज व एक्वा लाइन बाधित झाली होती. दीर्घ टाळेबंदीनंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत या मार्गांवर मेट्रोचे पुन्हा संचालन सुरू झाले. यावेळी रायडरशिप वाढविण्यासाठी महामेट्रो प्रशासनाने विविध उपक्रम राबविले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने हळूहळू मेट्रोची प्रवासी संख्याही वाढायला लागली होती आणि दरदिवसी प्रवासी संख्येचा विक्रम स्थापित व्हायला लागला होता. यात याच वर्षी २६ जानेवारी रोजी गणराज्यदिनी सर्वाधिक ५६ हजार प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला होता. त्यानंतर मात्र, शहरात कोरोना प्रकोप पुन्हा एकदा दिसायला लागला आणि प्रवाशांच्या संख्येत घसरण व्हायला लागली. १५ एप्रिल रोजी राज्य सरकारद्वारे टाळेबंदी घोषित झाल्यानंतर मेट्रोला तर प्रवासीच मिळेना, अशी स्थिती होती. सरकारने टाळेबंदीच्या काळात केवळ जीवनावश्यक सेवांशी निगडित लोकांनाच मेट्रोने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याने, अन्य प्रवासी मेट्रोचा लाभ घेऊ शकत नाहीत. शिवाय, अत्यावश्यक सेवांशी निगडित बहुतांश लोकही खासगी किंवा शासकीय वाहनांचाच उपयोग करताना दिसत आहेत. त्यामुळे, १५ एप्रिलपासून ऑरेंज व ॲक्वा लाइनवर दररोज सरासरी एक हजार ते ११०० प्रवासीच मेट्रो सेवेचा लाभ घेत असल्याचे महामेट्रोच्या अधिकारिक सूत्रांनी सांगितले. टाळेबंदी संपताच प्रवाशांची संख्या पुन्हा वाढायला लागेल, असे महामेट्रोचे अधिकारी सांगत आहेत.
----------------
बॉक्स...
एक तासाच्या अंतराने मिळत आहे मेट्रो
टाळेबंदीतही अत्यावश्यक सेवांशी निगडित लोकांना ऑरेंज व ॲक्वा लाइनवर मेट्रो एक तासाच्या अंतराने उपलब्ध होत आहे. खापरी ते सीताबर्डीपर्यंत ऑरेंज लाइनवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत आणि लोकमान्यनगर ते सीताबर्डीपर्यंत ॲक्वा लाइनवर सकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत दर तासाला मेट्रो चालवली जात आहे.
............