लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या विकासाच्या मुद्यावरुन कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मागील पाच वर्षांमध्ये शहरात कुठले प्रकल्प आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागपुरात ‘मेट्रो’ तसेच ‘मिहान’ हे प्रकल्प तर मीच आणले होते. मात्र भाजपाचे नेते सर्व ‘क्रेडिट’ घेत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. रविवारी देवडिया कॉंग्रेस भवन येथे कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.‘मेट्रो’ची सैद्धांतिक मान्यता आणणे, ‘डीपीआर’ तयार करणे मीच केले. भूमिपूजन होऊ शकले नाही. आता दोन दिवस ‘मेट्रो’ चालवली तर भाजपचे लोक ‘क्रेडिट’ घेत आहेत. नाना पटोले यांना शहराची माहिती तरी काय असे भाजपचे लोक म्हणतात. मात्र लोकसभेची निवडणूक ही उमेदवाराची नाही तर कार्यकर्त्याची असते. शासनाने बाबा रामदेव यांना कवडीमोल दरात जमीन दिली. मात्र येथे रोजगार तर मिळालेच नाही. शहरात रोजगारनिर्मिती किती झाली यावर भाजपचे लोक का बोलत नाहीत, असा सवाल मुत्तेमवार यांनी केला. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. पण विदर्भवाद्यांच्या तोंडाला गेल्या पाच वर्षांत पानेच पुसण्यात आली आहेत. नागपुरात संघभूमी विरुद्ध दीक्षाभूमी अशी लढाई असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान, नाना पटोले यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन कामाला लागावे, असा या बैठकीत नेत्यांचा सूर होता. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, नाना पटोले, बाबुराव तिडके, यादवराव देवगडे, अॅड. अभिजित वंजारी, शेख हुसैन, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, संजय महाकाळकर, अतुल लोंढे यांच्यासह शहर काँगे्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व विविध आघाड्यांचे पदधिकारी उपस्थित होते.
बूथवर मते मिळाली तरच पद राहणारकाँग्रेसमधील अनेक नेते भाजपात गेले तर अनेक लाभार्थी झालेत. पक्षाच्या झेंड्याखाली राहतात पण इतरांसाठी काम करतात. अशा नेत्यांची गय केली जाणार नाही. राज्यात व देशात सत्ता नसूनही कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवला. पक्षाचा पदाधिकारी असलेल्या बूथवर उमेदवाराला अधिक मते मिळाली तरच तो पदाधिकारी पदावर कायम राहील, असा इशारा विकास ठाकरे यांनी यावेळी दिला.