लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या भागात मेट्रो रेल्वे धावत नाही त्या ठिकाणी मेट्रोच्या प्रवाशांना पोहोचविण्यासाठी आता मेट्रोची फिडर सेवा आपली बसच्या वतीने सुरू झाली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अॅक्वा लाईनवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा व आजूबाजूला जाण्यासाठी फिडर सर्व्हिसच्या रूपाने आपली बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एमआयडीसी गेट
खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एमआयडीसी गेट व एमआयडीसी गेट ते खापरी स्टेशनपर्यंत नागपूर महापालिकेने आपली बस सेवा सुरू केली आहे. बुटीबोरी एमआयडीसी गेटवरून सकाळी ७.०५ वाजता आणि खापरी मेट्रो स्टेशन येथून सकाळी ७.५० वाजता दररोज फिडर सेवा बस उपलब्ध राहणार आहे. सायंकाळी बुटीबोरीवरून अखेरची फेरी सायंकाळी ७.१० वाजता आणि खापरी मेट्रो स्टेशनवरून बुटीबोरी एमआयडीसी गेट येथे जाण्यासाठी सायंकाळी ७.५५ वाजता प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. सोबतच सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवरून महामेट्रोतर्फे नागरिक अॅक्वा लाईन मार्गाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, एलएडी चौक, सुभाषनगर, वासुदेवनगर, बन्सीनगर आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करता येणार आहे. लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय रुग्णालयाच्या दरम्यान फिडर बस उपलब्ध आहे. ही बस दररोज हिंगणावरून सकाळी ७.२५ वाजता आणि लोकमान्यनगर स्टेशनवरून ८.१० वाजतापासून उपलब्ध राहणार आहे. तसेच सायंकाळी अंतिम फेरी ७ आणि ७.३० वाजता उपलब्ध राहील.
येथे लवकरच होणार सेवा उपलब्ध
लता मंगेशकर हॉस्पिटल, इसासनीपर्यंत फिडर सेवा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी विचार सुरु आहे. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवरून मेट्रो द्वारा नागरिक ऑरेंज लाईन मार्गाच्या रहाटे कॉलनी, अजनी चौक, जयप्रकाशनगर, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करता येईल.
नॉन मेट्रो परिसरात कनेक्टिव्हिटी
आता मार्ग क्रमांक ४ व ७ सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते पिपळा फाटा, हुडकेश्वर नाका परिसर, राजापेठ, म्हाळगीनगर, न्यू सुभेदारनगर, अयोध्यानगर, रघुजीनगर, हनुमाननगर, मेडिकल चौक, बसस्थानक, कॉटन मार्केट, धरमपेठ, शंकरनगर, रामनगर, रविनगर, डब्ल्यूसीएल कॉलनी, सेमिनरी हिल्स, हजारी पहाडसाठी सुविधा उपलब्ध राहील. मार्ग क्रमांक १९ सीताबर्डी मेट्रो स्टेशन ते न्यू नरसाळापर्यंत ही फिडर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेगळे द्यावे लागणार भाडे
फिडर बस सेवेसाठी नागरिकांना वेगळे भाडे द्यावे लागणार आहे. सध्या कॉमन मोबिलिटी कार्डची तयारी करण्यात येत आहे. ही व्यवस्था झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवाशांना फिडर सेवेसाठी वेगळे भाडे देण्याची गरज भासणार नाही. ते ऑनलाईन आपला मार्ग निवडून मेट्रो व फिडर सेवेसाठी सोबतच भाडे देऊ शकणार आहेत.