लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरात पारडीजवळ मेट्रो पिलरच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला लोखंडी सळाकींचा ढाचा मंगळवारी रात्री अचानक जमिनीकडे झुकल्याने वित्त आणि प्राणहानी झाली नाही. ही घटना गांभीर्याने घेत महामेट्रो प्रशासनाने संबधित कंपनी व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली आहे.
महामेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी सांगितले, लोखंडी ढाचा झुकण्याच्या घटनेत कंत्राटदार आयटीडी सिमेंटेशन कंपनीवर तीन लाख रुपये, जनरल कन्स्लटंटवर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यासह जनरल कन्स्ल्टंटच्या एका साईट अभियंत्याला निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना साईटवर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सच्या आत घडली. त्यामुळे प्राणहानी झाली नाही. पण पुढे अशी घटना घडू नये, याकरिता विशेष दक्षता बाळगण्यात येणार आहे.
पारडीजवळ सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान मंगळवारी रात्री निर्माणाधीन मेट्रो पिलरच्या सळाकींचा ढाचा अचानक खाली झुकल्याने खळबळ उडाली होती. या पिलरमध्ये पुढे काँक्रिट करण्यात येणार होते. या घटनेमुळे मजूर, पादचारी अथवा कुठल्याही वाहनचालकाला इजा झाली नाही. ही घटना गांभीर्याने घेत महामेट्रो प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.