मोरेश्वर मानापुरे, नागपूर: दहा वर्षांच्या कालावधीत संपूर्ण टीमच्या सहकार्याने नागपूर मेट्रोने अनेक रेकॉर्ड स्थापन केले आहे. ही मेट्रो रेल्वेसाठी गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी येथे केले. नागपूर मेट्रो रेल्वेचा दहावा वर्धापनदिन बुधवारी मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे, संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी आणि नागपूर व पुणे मेट्रोचे वरिष्ठ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
हर्डीकर म्हणाले, नागपूरकरांच्या विश्वासामुळे मेट्रोने दहा वर्षांचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रवाशांची संख्या ८० हजारांवर गेली आहे. नागपूर शहरात ९ लाख परिवार राहत असून प्रत्येक परिवारातील एका व्यक्तीने मेट्रोने प्रवास केला तर मेट्रोचे ध्येय साध्य होईल. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम रेकॉर्ड वेळेत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सन २०२५ अखेर ८ किमीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल. नागपूर मेट्रो देशातील सर्वोत्कृष्ट मेट्रो करण्याचा संकल्प आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते, हे विशेष.