नागपूर : गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढणाऱ्या महामेट्रोच्या रायडरशिपने रविवारी पुन्हा एकदा भरारी घेतली असून मागील सर्व रविवारचे विक्रम मोडत २७ हजारांचा आकडा पार केला आहे. रविवारची एकूण रायडरशिप २७,२२४ इतकी होती. २६ जानेवारीनंतर ही दुसरी सर्वात जास्त प्रवासी संख्या आहे. २६ जानेवारीला ५६,४४१ लोकांनी प्रवास केला होता.
कोरोनामुळे थांबलेली महामेट्रोची प्रवासी सेवा गेल्यावर्षी सुरू झाली. मेट्रोने सातत्याने रायडरशिप वाढविण्याकरिता प्रयत्न करताना विविध योजना राबविल्या. मेट्रो रेल्वेत सायकल नेण्याची परवानगी देणे, स्टेशनवर विविध वस्तूंचे स्टॉल लावणे, मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन, सेलिब्रेशन ऑन व्हील्ससारखे उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांचा फायदा नागपूर मेट्रोला झाला असून प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. २५ व २६ जानेवारीला विविध प्रकारच्या स्टॉलमुळे मेट्रो स्टेशनला कार्निव्हलचे रूप प्राप्त झाले होते. सीताबर्डी इंटरचेंज स्थानकावर तर स्टॉल्ससोबत देशभक्तीपर व इतर गाण्यांचे कार्यक्रम राबविले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची संख्या वाढत आहे.